(इक्बाल जमादार )
खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात असल्याने जगबुडी नदीपात्राची सध्या कचराकुंडी झाली आहे. नदीपात्रात सांडपाणी सोडले जात असल्यामुळे येथील पाणी दूषित झाले आहे. नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जगबुडी नदीची अशी अवस्था झाली असल्याचे पर्यावरण प्रेमींनी प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
नदीच्या पात्रात ठिकठिकाणी वाळूच्या टेकड्या तयार झाल्या असून यामुळे पावसाळ्यात पूर परिस्थिती ओढण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य धोका समोर उभा असताना नगरपालिका प्रशासन काहीच उपाययोजना करत नसल्याने स्थानिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. स्थानिक फळ विक्रेते, चिकन मटण-मासे विक्रेते यांना नदीपात्रात कचरा न फेकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र नगर परिषद चे यावर लक्ष नसल्याने व प्रशासन कारवाईसाठी कोणताच पुढाकार घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जगबुडी नदीपात्रातील पाण्यावर गेल्या काही दिवसांपासून कचरा तरंगू लागला आहे. रात्री-अपरात्री नदीपात्रात फेकला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या कचऱ्यामुळे नदी पात्र दूषित झाले आहे. खेड शहर तसेच खाडीलगत असलेल्या भोस्ते, अल्सुरे या गावातील ग्रामस्थ नदीपात्रात कचरा फेकत आहे असल्याचे बोलले जात आहे. नगरपालिका प्रशासनाने नदीपात्रात कचरा फेकणाऱ्यांवर लक्ष ठेवून कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, मात्र प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने जगबुडी नदी पात्राची दिवसेंदिवस कचराकुंडी होत चालली आहे.
जगबुडी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात कपडे धुतले जातात. त्यामुळेही नदीपात्र दूषित होत आहे. नदीपात्र दूषित होऊ नये यासाठी नगरपरिषदेने कपडे धुण्यासाठी धोबीघाट बांधून देणे गरजेचे आहे, मात्र धोबीघाट बांधण्याबाबत नगरपालिका प्रशासनाची उदासीनता असल्याने नदीपात्रातील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
खेड नगर परिषद प्रशासनाने काही वर्षापूर्वी नदीपात्रात कचरा फेकणाऱ्या लोकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तंबी दिली होती. त्यानंतर काही अंशी नदीपात्रात कचरा फेकण्याची प्रमाण घटले होते. मात्र आता नदीपात्र पुन्हा कचऱ्याने भरत चालले आहे. जगबुडी नदी पात्रात मगरीचा मोठ्या प्रमाणात वावर असून गेल्या वर्षभरात काही मगरींचा हे प्रदूषण वाढल्याने मृत्यू झाल्या असल्याच्या चर्चा आहेत.
जगबुडी नदी पात्रातील पाणी प्रदूषित झाल्याने नागरिकांचे आरोग्य मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे. मासेही मृत होत आहेत. जगबुडी नदी पात्रात केवळ मानवनिर्मिती कचरा साचलेला नसून पावसाळ्यात सह्याद्रीच्या रागातून मोठ्या प्रमाणात वाहून आलेल्या लाकडी ओंडके व पालापाचोळा यांचा देखील त्यात समावेश आहे. जगबुडी नदी खेड शहरानजीक खाडीला जोडली जाण्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रवाहित होते. त्यामुळे तिचा प्रवाह संथ होतो. या टप्प्यात नदीपात्रातील वळणाच्या ठिकाणी नदीने वाहून आणलेला गाळ साचून अनेक लहान-मोठे बेटे तयार झाली असून त्या ठिकाणी नदीपात्रात ओटी काळात कचरा साचून राहतो. भरतीच्या काळात खाडी भागात गाळाच्या बेटात साचलेला कचरा जगबुडी नदीपात्रात पुन्हा वाहून येतो. त्यामुळे भरतीच्या कालावधीतील शहरानजिक जगबुडी नदी पात्रात कुजलेला पाला बाजूला व मानव निर्मित फेकलेल्या कचरा याची डिंक पाण्यावर तरंगताना दिसतात.
कचऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाच्या संबंधित विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. जगबुडी नदीतील स्वच्छ पाणी राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे व यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. मात्र प्रशासनाने काही बाबीकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. तर काही राजकीय पुढारी या आरोग्याच्या विषयाबाबत मुग गिळून का गप्प आहेत याची चर्चा स्थानिक जनतेतून दबक्या आवाजात सुरू आहे.