(जाकादेवी/ वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धजन पंचायत शाखेतर्फे विश्वशांतीदूत भगवान गौतम बुद्ध यांचा २५६६ वा जयंती महोत्सव शाखेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश भागुराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे धडाडीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार, मुंबई कमिटीचे अध्यक्ष विजय पवार, प्रमुख व्याख्याते जाकादेवी हायस्कूलचे शिक्षक संतोष पवार, केंद्रप्रमुख अनिल पवार, मुंबई कमिटीचे अनंत पवार, दिपक पवार, गौतम पवार, कमिटी सचिव संजय पवार, रामचंद्र पवार, किशोर पवार, प्रियेश पवार, सुभाष पवार, राकेश पवार, प्रमोद पवार, कलाध्यापक उत्तम पवार, अनंत पवार, भिमराज पवार तसेच महिला मंडळ अध्यक्षा कल्पना पवार स्थानिक व मुंबई कमिटीचे पदाधिकारी, तरुण मंडळ, क्रिकेट संघाचे सदस्य तसेच कमिटी सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रारंभी पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण माजी अध्यक्ष रामचंद्र धर्मा पवार यांच्या हस्ते तर पक्षीय झेंड्याचे ध्वजारोहण मुंबई कमिटीनचे अध्यक्ष विजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कळझोंडी बुद्धविहार जिर्णोद्धार कामी देणगी देणाऱ्या सर्व देणगीदारांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आला. जयंती महोत्सवानिमित्त प्रमुख व्याख्याते संतोष पवार यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या विज्ञानवादी दृष्टिकोन उपस्थितांना पुढे मांडताना सांगितले की, भगवान बुद्ध म्हणाले, मी मोक्षदाता नाही, मी मार्गदाता आहे. मी सांगितलेल्या पंचशील व अष्टांगिक मार्गाचा आपण अवलंब केल्यास आपले जीवन दुःखमुक्त होऊन सुखकर होऊ शकेल.बुध्दांनी विज्ञानवादी, वास्तववादी विचार मांडून बहुजनांना स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुत्वाची शिकवण दिली.
पुढे बोलताना संतोष पवार म्हणाले की, आजच्या युवकांनी बुद्धाचे चरित्र वाचून विज्ञानवादी दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज असल्याचे सांगितले, तर आजच्या महिला पालकांनी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या पंचशील व अष्टांगिक मार्ग यांचा मराठीतील अर्थ आपल्या पाल्यांना समजून सांगणे काळाची गरज असल्याचे मत आवर्जून व्यक्त केले. केंद्रप्रमुख अनिल पवार, दिपक पवार, किशोर पवार,प्रियेश पवार,गौतम पवार,अनंत पवार, विजय पवार, प्रकाश भागुराम पवार, तसेच तालुकाध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांनी आपले भगवान बुद्धांच्या जीवनावरील क्रांतिकारी विचार व्यक्त केले.
तालुकाध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांनी बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व सांगून समाजातील बंधू भगिनींनी सांघिक भावनेने पुढे येऊन सामुहिक कार्यक्रम अतिशय थाटात संपन्न करण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेने पुढाकार घेण्याचे त्यांनी उपस्थित जनसमुदायाला आवाहन केले. तसेच सर्व दानशूर देणगीदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पुढाकार व योगदान दिलेल्या बंधू-भगिनींचे त्यांनी खास कौतुकही केले. जयंतीचे औचित्य साधून पदवीधर शिक्षिका समिक्षा पवार यांनी प्रेरणादायी बुद्ध गीत सादर केले.
दुपार सत्रात भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या जीवनावर दोन चित्रपट दाखवण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कमिटीचे सक्रिय सचिव संजय पवार यांनी केले. तर आभार केंद्रप्रमुख अनिल पवार यांनी मानले.