(निवोशी-गुहागर/उदय दणदणे )
“शाळा” म्हटली की शाळेतील प्रत्येक भिंत ही बोलकी असलीच पाहिजे. याचा प्रत्यय गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे सुंदर अशी रंगरंगोटी आणि ज्ञानात भर पडावी अशी भिंतींवर सुरेख अक्षरात लिहिलेली माहिती वाचल्यावर नक्कीच येतो.
अश्याच एका शाळेची आता रंगरंगोटी पाहायला मिळणार असून आम्ही गिरगावकर संस्था मुंबई पुरस्कृत “रंग दे माझी शाळा’ या उपक्रमा अंतर्गत गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा, वेळंब- नं.४ (वचनवाडी) या शाळेची रंगरंगोटी करणार आहे. रंगरंगोटी करण्यासाठी आलेल्या रंगाचे मोफत साहित्य दि. १८ मे बुधवार रोजी प्राप्त झाले.
२२ एप्रिल २०२२ रोजी जि. प.प्रा.आदर्श शाळा वेळंब नं.४ वचनवाडी ता.गुहागर या शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव यांनी सदर संस्थेकडे शाळेची रंगरंगोटी होण्याबाबत पत्राद्वारे विनंती केली होती. तसेच वेळंब गावचे पोलीस पाटील श्री स्वप्नील बारगोडे यांच्या सहकार्य प्रयत्नातून आता साहित्य उपलब्ध झाले आहे. या कार्यक्रमाला वचनवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव व श्री दिपक आरवळकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच वाडीतील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत रंगाचे साहित्य शाळेला देण्यात आले. त्यामुळे येत्या नवीन शैक्षणिक वर्षात वेळंब गावात एक नवीन रंगरंगोटी केलेली बोलकी शाळा मुलांच्या स्वागतासाठी हजर असणार आहे.