(मुंबई)
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या 14 मे रोजी जंगी सभा होणार आहे. राज ठाकरे यांच्या सभांनंतर शिवसेनेकडून या सभेची घोषणा करण्यात आली होती. भारतीय आर्युविमा रौप्य महोत्सवामध्येही उद्धव ठाकरेंनी आता काय तो सवाल जबाब होऊन जाऊ दे, असं वक्तव्य केलं होतं. त्यातच आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधकांना या सभेच्या निमित्ताने सज्जड इशारा दिला आहे.
मनसे नेते आमचे मार्गदर्शक कींवा कोणीही नाहीत. आम्हाला बाळासाहेबांचा आशिर्वाद आहे. याचा त्यांना पोटशुळ आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा अभूतपुर्व होणार आहे हे त्यांना माहित आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेला मैदान कमी पडेल. उद्या त्याची त्यांना प्रचिती दिसेल. त्यामुळे याला आडवं कसं जायचं हे ते पाहत आहेत. निवडणुका कधीही होऊ देत, शिवसेना ताकदीने लढणार आहे, असं अनिल परब म्हणाले.
अनिल परब यांनी यावेळी बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या यांना फक्त एकचं काम आहे. त्यामुळे कोण काय बोलतय याकडे आम्ही लक्ष देत नाही. आमचं लक्ष 14 तारखेवर आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभांमध्ये शिवसेनेला टार्गेट करण्यात आलं होतं. राज ठाकरे यांनी थेट नाव घेत उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे आता काय प्रत्युत्तर देणार? हे सर्वांसाठी ओत्सुकत्याचे ठरले आहे.