(रत्नागिरी/प्रतिनिधी)
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये रिक्त जागा भरण्यासाठी आरोग्य विभागाकडून जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानंतर लेखी परीक्षाही घेण्यात आली. मात्र परीक्षेच्या कालावधीत गोंधळ उडाल्याने परीक्षा रद्द करण्यात आली होती. मात्र आता रत्नागिरीतील महिला रुग्णालयातील 49 पदे तीन वर्षार्ंच्या कंत्राटी पध्दतीने भरली जाणार आहेत. यामध्ये अधिपरिचारिकांसह, रक्तपेढी तंत्रज्ञ, लिपिक, वाहनचालक, कक्षसेवक, औषधनिर्माण अधिकारी, मदतनीस, शिपाई या वर्ग 3 व 4 मधील कर्मचार्यांचा समावेश करण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयाला यापूर्वी नव्या शासकीय पदांना मंजुरी मिळाली होती, मात्र शासकीय भरती न करता आता कंत्राटी पध्दतीने भरतीप्रक्रिया राबवली जात असल्याने उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.
शासनाने वाशी, नवी मुंबई येथील खासगी कंपनीला कर्मचारी पुरवण्याचे कंत्राट दिले आहे. त्यांना कंत्राट देताना घालण्यात आलेल्या अटी व शर्तीनुसार येथे काम करणार्या कर्मचार्यांच्या नोकरीवर कोणत्याही क्षणी गदा येण्याची शक्यता आहे. या कर्मचार्यांचा शासनाशी थेट संबंध राहणार नाही असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना मिळणारी रोजगाराची संधी कोणत्याही क्षणी संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच कोणत्याही कर्मचार्याला कामावरुन कमी करण्याचा अधिकार कंपनीकडे दिला आहे.