(मुंबई)
आता स्मगलरांनी परदेशातून सोने लपवून आणण्याचे नवनवीन फंडे शोधले आहेत. मशीनचे पार्ट बनवून आता सोन्याची तस्करी केली जात असल्याचे आता उघड झाले आहे. गेल्या वर्षभरात असे ८३३ किलो सोने महसूल गुप्तचर विभागाने विमानतळावरून जप्त केले आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) हवाई मागार्ने होणाऱ्या सोने तस्करीचा नुकताच पदार्फाश केला आहे. तब्बल ११ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून सोने आणण्यात आल्याची माहिती मिळाली होती. एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये दाखल साहित्याची तपासणी करण्यात आली. सफाई यंत्र आणि विविध उपकरणांचे सुटे भाग असल्याचे त्यावर नमूद करण्यात आले होते. परंतु, अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे बारकाईने तपासणी केली असता, संबंधित यंत्राच्या दोन मोटारमध्ये चकत्यांच्या स्वरूपात ५.८ किलो सोने लपवून ठेवल्याचे आढळले. त्याचे बाजारमूल्य ३.१० कोटी रुपये इतके आहे. याप्रकरणी दक्षिण मुंबईतून एकास अटक करण्यात आली आहे.
लखनौ विमानतळावर सुद्धा ५ मे रोजी डीआरआयने सोने तस्करीचा प्रकार उजेडात आणला. या विमानतळावर इलेक्ट्रिकल थ्रेडिंग मशीनच्या आत सोने लपवून आणले होते. तपासणी केली असता ५.२ किलो सोने आढळून आले असून, त्याचे मूल्य २.७८ कोटी रुपये आहे. हे प्रकार उजेडात आल्यामुळे हवाई मालवाहतूक आणि कुरिअरच्या माध्यमातून होणाऱ्या तस्करीची नवी कार्यपद्धती शोधण्यास मदत झाली आहे. २०२१-२२ या कालावधीत तस्करी केलेले ८३३ किलो सोने महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी एकूण जप्त केले आहे. त्याचे मूल्य ४०५ कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती देण्यात आली.