(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दर महिन्यात १ ते ५ तारखेच्या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विभागातील कर्मचारी व अधिकारी वर्गाचे वेतन करण्यात येते. मात्र, १० मे तारीख उलटून गेल्यानंतरही रत्नागिरी महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अद्याप झालेले नाही. कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्याने महसूलच्या अधिकाऱ्यांना वेतन, मात्र कर्मचाऱ्यांना वेतन का नाही, असा प्रश्न कर्मचारी वर्गाकडून उपस्थित केला जात असून या कर्मचाऱ्यांकडून आता नाराजी व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी विलंब होत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र स्वतःचे वेतन काढून घेतले, अशी चर्चा देखील कर्मचाऱ्यांमधे रंगू लागली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे महसूल अधिकारी तुपाशी आणि कर्मचारी उपाशी अशी स्थिती निर्माण झाली आहे.
कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी विलंब होण्यामागचे कारण असे सांगितले जाते की, मार्च महिन्याच्या अनुदानातून कर्मचारी व अधिकारी वर्गाचे एप्रिल महिन्याचे वेतन करण्यात आले होते. मार्च महिन्यांच्याच उर्वरित अनुदानातून मे महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांचे न करता अधिकाऱ्यांचे वेतन करण्यात आले. मानवतेच्या दृष्टीने व महाराष्ट्र नागरी वर्तणूक सेवा नियम (शिस्त व आपिल) १९७९ नुसार, असा प्रकार गैरलागू आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी प्रसारमाध्यमांद्वारे कर्मचाऱ्यांनी केली आहे.