(गणपतीपुळे/ वैभव पवार)
रत्नागिरीतील आरे वारे समुद्र किनाऱ्यावर सुरू झालेल्या साहसी क्रीडा प्रकारातील ओशन प्लाय झीपलाईन प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी सायंकाळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील व उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. तर त्यांचे समवेत कोतवडे जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतींचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य व विविध मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रावरील या पहिल्या झीप लाईनमुळे पर्यटकाला चौदाशे फूट लांब अंतरापर्यंत समुद्रावरून आकाशात पक्षाप्रमाणे विहार करता येणार आहे. या झीपलाईन प्रकल्पामुळे रत्नागिरीच्या पर्यटन वृध्दीबरोबरच स्थानिक लोकांच्या बीचवरील उद्योगांमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. झीपलाईन राईड ही पर्यटकांसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे एमव्ही एडवेंचर तर्फे रत्नदुर्ग माउंटेनिअर्स चे अध्यक्ष विरेंद्र वणजु व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उद्घाटन कार्यक्रमात सांगितले. या प्रकल्पाच्या उभारणीत सर्व तांत्रिक गोष्टींपासून ते सर्व उपकरणांपर्यंत इंटरनॅशनल स्टॅंडर्डसचा वापर करण्यात आला आहे. शासनाच्या साहसी पर्यटन धोरणांतर्गत शासनाने नेमून दिलेल्या गाईड लाईनसचे पालन करून झीपलाईनची उभारणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.