(राजापूर )
आपल्या आमदार आणि राज्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत राजापूर तालुक्यात दळणवळणाचे जाळे निर्माण करणाऱ्या माजी राज्यमंत्री आणि कुणबी समाजाचे नेते कै. ल. रं. तथा भाईसाहेब हातणकर यांचे नाव मुंबई गोवा महामार्गावर अर्जुना नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला देण्यात यावे अशी मागणी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा राजापूरच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच आमदार डॉ. राजन साळवी यांना देण्यात आले आहे.
यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती दिपक नागले यांच्यासह संघ प्रतिनिधी मंडळ सदस्य प्रभाकर वारीक, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, उपतालुकाप्रमुख राजन कुवळेकर, कुणबी संघ राजापूर शाखा कार्यकारीणी सदस्य मनोहर गोरीवले यांच्यासह अन्य कुणबी समाजबांधव उपस्थित होते. राजापूर मतदारसंघाचे पाचवेळा विधानसभेमध्ये प्रतिनिधीत्व करताना कै. भाईसाहेब हातणकर यांनी आपल्या कार्यकाळात विकासकामांसाठी अल्प निधी मिळत असतानाही मतदारसंघाच्या विकासामध्ये महत्वाची भुमिका बजावली. दूर-दूरवर विखुरलेल्या गावांच्या दुर्गम पायवाटा संपुष्टात आणून गावांना रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्याच्या कामाचा पाया रचण्याचे काम केले.
राजापूर तालुक्याला कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांना रस्त्यांच्या सहाय्याने जोडण्यासह कॉजवे आणि नदी-नाल्यांवरील छोटे-मोठे पूल बांधून पावसाळ्यातील प्रवाशांसह लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न निकाली काढला. एवढच नाही तर आपल्या निष्कलंक, निस्वाथी आचरनातून राजकारणात अनुकरणी आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांसमोर कायमस्वरूपी राहण्यासाठी अजुर्ना नदीवरील सर्वाधिक उंचीच्या पूलाला त्यांचे नाव द्यावे अशी कुणबी संघाच्यावतीने मागणी करण्यात आली आहे.