(रत्नागिरी)
तालुक्यातील आरे-वारे समुद्र किनाऱ्यावरील जिल्ह्यातील पाहिल्या झिपलाईन या पर्यटन प्रकल्पाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पर्यटकाला १४०० फूट लांबपर्यंत, समुद्रावरून आकाशामध्ये पक्षाप्रमाणे विहार करताना निसर्गाचे अवर्णनीय रूप, समुद्राच्या फेसाळलेल्या लाटा आणि बेभान वाऱ्याचा आस्वाद घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. या झिपलाईनचे उद्घाटन उद्या रविवार 8 मे रोजी सायंकाळी 4 वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहेत.
आरे-वारे समुद्र किनाऱ्यावर आता पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. परंतु पर्यटक तिथे जास्त वेळ घालवत नाही नेमकी हिच गोष्ट लक्षात घेऊन रत्नागिरीमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी तसेच रत्नागिरीतील साहस प्रेमींसाठी आरे-वारे समुद्रावरून झिपलाईन हा नवीन साहसी क्रीडा प्रकार सुरू होत आहे. प्रकल्पासाठी स्थानिक प्रशासन आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड तसेच आरे-वारेतील ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या झिपलाईन प्रोजेक्टमुळे रत्नागिरीच्या पर्यटन वृद्धीस हातभार तर लाणार आहे. तसेच साहसी पर्यटनस्थळ म्हणून या भागाची नवी ओळख होणार आहे. जिल्ह्यातील समुद्रावरील या पाहिल्याच झिपलाईनमुळे पर्यटकाला १४०० फूट लांबपर्यंत, समुद्रावरून आकाशामध्ये पक्षाप्रमाणे विहार करताना निसर्गाचे अवर्णनीय रूप, समुद्राच्या फेसाळ लाटा आणि बेभान वायाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार असल्याने झिपलाईन प्रकल्प लवकरच प्रसिद्धी झोतात येणार आहे.
या झिपलाईन प्रोजेक्टमुळे रत्नागिरीच्या पर्यटन वृद्धीबरोबरच स्थानिक लोकांच्या बीच वरील उद्योगधंद्यांमध्ये वाढ होईल. यामध्ये हॉटेल, रिक्षा व्यावसायिकांपासून याच्याशी निगडीत अनेकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार आहे. झिपलाईन राईड ही माफक दरात असून पर्यटकांसाठी पुर्णपणे सुरक्षित आहे . यामध्ये उभारणीतील सर्व तांत्रिक गोष्टींपासून ते सर्व उपकरणांपर्यंत इंटरनॅशनल स्टैंडर्डचा वापर करण्यात आलेला आहे. या झिपलाईन मध्ये वापरण्यात आलेली सगळी उपकरणे मानांकित आहेत. महाराष्ट्र शासनाच्या साहसी पर्यटन धोरणांतर्गत शासनाने नेमून दिलेल्या मार्गदर्शन तत्वांची काटेकोर पालन करून झिपलाईनची उभारणी करण्यात आलेली आहे.
या झिपलाईनसाठी प्रोफेशनल सर्टिफाइड प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांना या क्षेत्रातील कामाचा अनुभव आहे. तसेच मदतनीस म्हणून स्थानिक तरुणांना रोजगारची संधी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी प्रमाणित प्रथमोपचारक आणि प्रथमोपचाराच्या साधनांची पूर्तता केलेली आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मुंबईतील ‘मलय अॅडव्हेंचर्स’ चे प्रमुख मेहबूब मुजावर यांचे तांत्रिक मार्गदर्शन व मोलाचा सहभाग लाभला. ‘रत्नदुर्ग माउंटेनिअर्स’ संस्थे अध्यक्ष विरेंद्र वणजु, दिनेश जैन, जितेंद्र शिंदे, गणेश चौगुले आदींच्या पुढाकारामुळे हा
प्रकल्प पुर्णत्वास गेला.