(संगलट-खेड /इक्बाल जमादार)
मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन, मुंबई मार्फत झालेल्या होमीभाभा बालवैज्ञानिक तृतीय पातळीवरील परीक्षेचा निकाल शुक्रवार दिनांक ६ मे २०२२ रोजी जाहीर झाला. यामध्ये खेडमधील रोटरी स्कूलच्या इयत्ता सहावीतील कु. स्नेहा सुदेश दिवेकर व कु. अवनिश अश्विन जगताप यांनी प्रत्येकी रौप्यपदक पटकावून बालवैज्ञानिक होण्याचा बहुमान मिळविला.
होमीभाभा बाल वैज्ञानिक परीक्षेकरिता शाळेतील तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कु. स्नेहा दिवेकर हिने ‘स्थानिक वनांचा डेटाबेस’ व कु. अवनिश जगताप याने ‘प्राचीन, दुर्मिळ वृक्षांची ओळख व संरक्षण’ या कृती संशोधन विषयाची निवड करून प्रात्यक्षिके सादर केली. त्यासाठी त्यांनी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, अमृते नर्सरी गवे, मोकल बाग टाळसुरे, जिजामाता उद्यान खेड, भरणे ग्रामपंचायत येथे प्रत्यक्ष भेटी दिल्या.
कु. स्नेहा दिवेकर व कु. अवनिश जगताप या बालवैज्ञानिकांना मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन तर्फे राम गणेश गडकरी, रंगायतन, ठाणे येथे पदक व बालवैज्ञानिक प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिक्षिका सौ. तनुजा चव्हाण, सौ. तेजश्री क्षीरसागर, सौ. रीटा पाटणे, सौ. अश्विनी पाटील, सौ. मीरा पवार, सौ. दिपाली दरेकर, प्रयोगशाळा सहाय्यक सौ. प्राजक्ता गावडे व सर्व विज्ञान विषय शिक्षक यांनी मोलाचे मार्गदर्शन लाभले.
रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीन पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी बालवैज्ञानिकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फोटो : रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल मधील यशस्वी बालवैज्ञानिक (छाया- इक्बाल जमादार, संगलट-खेड )