(नवी दिल्ली)
मागील काही दिवसांपासून देशासह राज्याच्या राजकीय वातावरणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सक्तवसुली संचलनालय चांगलेच सक्रीय झाले असून देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी केली जात आहे. यात झारखंड, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहारमध्ये १८ ठिकाणी शुक्रवारी सकाळी ईडीनं मोठी कारवाई केली आहे. एका महिला सनदी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावरही ईडीनं छापा टाकल्यानं खळबळ उडाली आहे.
दरम्यान, झारखंडची राजधानी रांची येथील पल्स हाँस्पिटल शिवाय पंचवटी रेसिडेंट, कांके रोड, चांदनी चौक, हरिओम टॅावर येथे ईडीने छापेमारी केली आहे. झारखंडच्या खनिज आणि भूवैज्ञानिक विभागाच्या सचिव पूजा सिंघल यांचीही चौकशी ईडी करत असल्याचे सुत्रांनी सांगितले. पूजा सिंघल आणि उद्योगपती अमित अग्रवाल यांच्या कार्यालयावर ईडीनं छापा टाकला आहे. पूजा सिंघल यांचे घर, कार्यालयावर केलेल्या ईडीच्या कारवाईचे फोटो समाजमाध्यमांवर शेअर झाले आहेत. आपल्या पदाचा गैरउपयोग करुन १८ कोटी रुपयांच्या सरकारी संपत्तीत गैरव्यवहार झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
झारखंडचे कनिष्ठ अभियंत्रा राम विनोद प्रसाद सिन्हा यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाशी संबधीत असलेल्यांवर ईडीनं फास आवळायला सुरवात केली आहे. सिन्हा यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. रांचीच्या पल्स हॉस्पीटलमध्ये ईडीचं पथक पोहचलं आहे. येथे रुग्ण आणि हाँस्पिटल कर्मचारी सोडून अन्य कुणालाही प्रवेश दिला जात नसून परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. झारखंडसह देशात १८ ठिकाणी हे छापेमारी सत्र सुरु असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गौण खणिजमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली होती, त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे.