(रत्नागिरी)
रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण संघाच्या सन 2021 सालच्या विविध पुरस्कारांचे वितरण उद्या ८ मे रोजी दुपारी ३.३० वाजता शेरे नाका येथील कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात केले आहे.
ब्राह्मण हितवर्धिनी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, संचालक आणि दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभेचे अध्यक्ष उदय गोविलकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे थाटात वितरण करण्यात येणार आहे. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, पुस्तक भेट आणि श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्चरी चॅंपियनशिपमध्ये पदक पटकावणाऱ्या सावर्डे येथील आंतरराष्ट्रीय तिरंदाजपटू (आर्चरी) खेळाडू ईशा पवार हिला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
नाणार (ता. राजापूर) येथे गेली ४० वर्षे वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. मोहन किरकिरे यांना यंदाचा धन्वंतरी पुरस्कार दिला जाणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक कोकणी माणूस, मोटार जगतचे संपादक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांना दर्पण पुरस्कार देण्यात येणार आहे.
आदर्श पौरोहित्य पुरस्कार रत्नागिरीतील दशग्रंथी विद्वान वेदमूर्ती नारायण जोगळेकर यांना आणि आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार कोळंब शाळेचे (ता. राजापूर) शिक्षक प्रसाद काकिर्डे (ताम्हाणे, राजापूर) यांना प्रदान करण्यात येईल.
महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक राज्यात कीर्तने करणाऱ्या महेश सरदेसाई (मोर्डे, संगमेश्वर) यांना आदर्श कीर्तनकार पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
उद्योजिका पुरस्कार लांज्यातील संकल्प फूडसच्या संचालिका सौ. पूर्वा प्रभुदेसाई यांना देण्यात येणार आहे. तसेच उद्योगिनी पुरस्कार श्री समर्थ कृपाच्या संचालिका सौ. सीमा आठल्ये (शिपोशी, लांजा) यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख देणगीदारांचे सत्कार करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या सदस्य व ज्ञातीबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर आणि उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये यांनी केले आहे.