(रत्नागिरी)
मत्स्य विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि केंद्रीय मत्स्यकी संस्था यांच्या संयुक्त विद्यमान गोळप येथील समुद्र शेवाळाची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. येथील किनार्यावर टाकलेल्या साठ राफ्टमधून ५५० किलो उत्पादन मिळाले आहे. त्या शेवाळाचा उपयोग काळबादेवी येथे लागवडीसाठी केला आहे.
ग्रामीण भागातील महिला बचत सक्षमीकरणासाठी समुद्र शेवाळाची लागवड करण्यात आली आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेतून गोळप, मिर्या, भाट्ये आणि काळबादेवी येथील किनारे लागवडीसाठी निवडले आहेत. ‘कप्पाफिकस्‘ या जातीच्या समुद्रशेवालाची लागवडीचा पहिला प्रयोग गोळप येथे करण्यात आला. त्यासाठी सेट्रल मरीन फिशरी रिसर्च इन्स्टटयुटचे डॉ. अजय नाखवा, मत्स्यकी संस्थेचे रामकुमार यांचे मार्गदर्शन लाभले.
गोळप येथे १० बाय १० मीटरचे ६० राफ्ट तयार केला आहे. त्यात ५० किलो कप्पाफिकस् जातीची समुद्रशेवाळ टाकली होती. ४५ दिवसानंतर पूर्ण वाढ झालेली समुद्र शेवाळ या महिलांनी बाहेर काढली. ६० राफ्टमधून मिळून ५५० किलो शेवाळ काढण्यात आले. अवकाळी पावसामुळे समुद्र खवळलेला होता. उधाणामुळे पाणी सतत हलत राहिल्याने शेवाळांच्या वाढीवर परिणाम झाला. काही शेवाळ तुटून गेली आहेत. या उत्पादनातून मिळालेल्या शेवाळांची पुन्हा लागवड केली गेली आहे. काळबादेवी येथे दहा नवीन राफ्ट टाकले आहेत. त्यामध्ये ५०० किलो शेवाळाची लागवड केली आहे. २० मेपर्यंत त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर ती काढली जाईल.
याच पध्दतीने भविष्यात समुद्र शेवाळांचे उत्पादन वाढविण्यासाठी मिर्या, भाट्ये येथील किनार्यावर हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यासाठी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी जगन्नाथ वानखेडकर, सहाय्यक अमरिश मेस्त्री, लेखाधिकारी प्रविण पाटील हे प्रयत्न करत आहेत.