(पुणे)
चोरट्यांनी आपला मोर्चा धार्मिक सत्संगकडे वळवला असल्याचे पुण्यातील एका चोरीच्या घटनेवरून दिसून येत आहे. पुणे- नगर रस्त्यावरील जकात नाका जवळील महालक्ष्मी लॉन्स येथे २ मेरोजी सुदिक्षा हरदेव यांच्या निरंकारी संत्संगाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शेकडो भक्त संत्संग ऐकण्यासाठी आले होते. सत्संग सुरू असताना बारामती येथून पुण्यात संत्संगाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी आलेल्या फिर्यादी महिलेची सोनसाखळी कोणीतरी ओढल्याचे त्यांच्या लक्षात आले. फिर्यादीला याची भणक लागताच त्यांनी आराडाओरड केल्याने तेथे उपस्थित असलेल्या महिलांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या दोन तरूणींना पकडले.
दिल्ली आणि हरियाणा येथून आलेल्या २ तरूणींनी पुण्यातील सत्संगातील महिलेच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी केली आहे. या तरूणींना तेथील भक्तांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. आरती राजकुमार ( वय २४ रा. हरियाणा) आणि सोनिया उमरपाल (वय २६, रा. नजबगड, दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघींची नावे आहेत
त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी करण्यात आली असता त्यांनी आपण दिल्ली आणि पंजाब येथे राहत असल्याचे सांगितले. एक तरूणी दिल्ली तर दुसरी तरूणी हरियाणा येथील आहे. त्याना संत्सगात चोरी करताना पकडण्यात आले आहे. मात्र, चोरी गेलेल्या दागिन्यांविषयी दोघींकडे चौकशी करूनही त्यांनी अद्यापही कोणतीही माहिती दिली नाही. त्यांचा अन्य साथीदार असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने दोघींकडे चौकशी सुरू आहे. दोघींवर संगणमताने चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली असल्याचे सहायक फौजदार अविनाश शेवाळे यांनी सांगितले.