(रत्नागिरी)
निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या हापूसला यंदा मुंबईची वाट दिसणार की नाही, असा प्रश्न होता. मात्र, मंगळवारी ४ मार्च रोजी हापूसच्या तब्बल ९ हजार पेट्या वाशी बाजारात दाखल झाल्या आहेत. यंदाच्या हंगामात मुबलक प्रमाणात आंबा बाजारात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे या वर्षी हापूसचे प्रमाण खूप कमी आहे. गतवर्षीच्या हंगामात या दिवसांत ३५ ते ४० हजार पेटी आंबा विक्रीला येत होता. या वर्षी आंबा उत्पादन अत्यल्प असल्यामुळे बाजारात पेट्या विक्रीला पाठवण्याचे प्रमाण कमी आहे. मंगळवारी वाशी बाजारपेठेत दिवसभरात एकूण ९ हजार १४१ आंबा पेट्या विक्रीला आल्या. त्यापैकी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून ४,५६६ तर अन्य राज्यांतून ४,५७५ आंबा पेट्या आल्या होत्या. दरवर्षी नैसर्गिक संकटामुळे आंबा उत्पादन धोक्यात येत आहे. यंदाही तीच स्थिती आहे. उत्पादनाची अशी स्थिती असताना या वर्षी प्रथमच ९ हजार पेट्या एकाच वेळी विक्रीला गेल्या आहेत. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गातून आंबा बाजारात पाठवण्यात येत असला तरी सर्वाधिक आंबा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे.
अन्य राज्यांतील आंबा
केरळ, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथून हापूस, बदामी, लालबाग आंबा विक्रीला येत आहे. कर्नाटक हापूस २५० ते ४०० रुपये किलो, बदामी १०० ते १५० रुपये, तर लालबाग ९० ते १२० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.
वीस दिवसांचा हंगाम बाजार
समितीतील आंब्याची आवक १५ मार्चनंतर वाढण्याची शक्यता आहे. १० ते ३० एप्रिल या दिवसांत आंबा बाजारात मुबलक असेल. त्यानंतर पुन्हा घसरण होणार आहे. मेमध्ये आंब्याचे प्रमाण किरकोळ असेल, असे बागायतदार सांगत आहेत.