(मुंबई)
जोगेश्वरीतील कथित भुखंड घोटाळा प्रकरणी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती समजले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांच्याविरुद्ध 9 जानेवारी रोजी ईडीने कारवाईचा फास आवळला. यानंतर ईडीने रवींद्र वायकर यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र पहिल्या समन्सला हजर न राहता रवींद्र वायकर सोमवारी हजर राहिले. यावेळी रवींद्र वायकर यांची ईडीकडून 9 तास चौकशी करण्यात आली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यसरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राजकीय दबावातून ईडी चौकशी झाल्याचा आरोप रवींद्र वायकर यांनी केला आहे.
रवींद्र वायकर सोमवारी सकाळी 11 च्या दरम्यान ते ईडीच्या बॅलार्ड पीयर येथील कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आणि रात्री नऊ वाजता कार्यालयाबाहेर पडले. यानंतर माध्यमांशी बोलताना रवींद्र वायकर म्हणाले की, ईडीने माझ्या घरी जेव्हा धाड टाकली तेव्हा त्यांनी सांगितले की, सुप्रिमो अॅक्टीव्हिटी सेंटर बांधलं त्या अनुषंगाने 2002 पासून ते आतापर्यंतचे कागदपत्र आम्हाला पाहिजे आहेत. आता 19 वर्षांचे कागदपत्र एका आठवड्यात देणे शक्य नव्हते. त्यामुळे मी त्यांच्याकडे वेळ मागून घेतला होता. माझी तब्येत बरी नव्हती आणि एवढ्या कमी वेळात कागदपत्र जमवून आणून देणे शक्य नव्हते. तसेच इनकम टॅक्सच्या कायद्यानुसार 7 वर्षांपर्यंतचे कागदपत्र देणे गरजेचे आहे. परंतु त्यांनी 19 वर्षांचे कागदपत्र एकदम मागितल्यामुळे मला कागदपत्र द्यायला वेळ लागला. परंतु आज त्यांनी मला चौकशीसाठी बोलावले होते त्यानुसार मी आज चौकशीसाठी आलो होतो, अशी माहिती रवींद्र वायकर यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयात तारीख असतानाही माझ्यावर आरोप करण्यात आला की, मी कोट्यावधी कमवले. 500 कोटींचा घोटाळा केला. मात्र तसे नाही आहे. 32 ते 36 कोटींचा व्यवसाय 19 वर्षात झाला आहे. त्यामुळे 20 कोटी खर्च हा पगार देण्यात झाला आहे. त्यामुळे फक्त 11 कोटी कमावले आहेत. यापैकी आम्हाला प्रत्येकी 1 कोटी 22 लाखाचा फायदा झाला. बाकीचा 5 कोटींचा फायदा हा पंजाब-महाराष्ट्र बँकेत आहे, असा हिशोब देतानाच रवींद्र वायकर म्हणाले की, आम्हाला महिन्याला किती फायदा झाला, याउलट पुनर्बांधकामाला परवानगी मिळाली तेव्हा बेसमेंटमध्ये त्यापेक्षा जास्त खर्च झाला आहे, हे मी त्यांना पटवून दिलं आहे, असं रवींद्र वायकर म्हणाले.
मला वेगळा कायदा का?
क्लबमध्ये लग्न होत नाहीत का? ज्या शाळांमध्ये हॉल आहेत तिथे लग्न होत नाहीत का? मग त्या ठिकाणी वेगळा कायदा आणि रवींद्र वायकरला वेगळा कायदा का? कुणाच्या दबावाखाली तुम्ही हे करत आहात? असा प्रश्नांचा भडीमार करत रवींद्र वायकर म्हणाले की, राजकीय दबाव आहे, हे मला माहिती आहे. पण मी कायद्याच्या कक्षात कोणतीही चूक केलेली नाही, हेच ईडीला सांगितलं आहे. त्यामुळे ते जेव्हा पुन्हा चौकशीसाठी बोलवतील तेव्हा नक्कीच जाणार आहे. हे सर्व राजकीय दबावातून चालू आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात निकाल लागेलच, पण तोपर्यंत मी कायद्याच्या दृष्टीने तपासयंत्रणांना सहकार्य करत राहणार आहे, असे रवींद्र वायकर म्हणाले.