व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून लग्नाच्या वाढदिवशी पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमधील जरीपटका घडली आहे. बेरोजगारी तसेच अपत्य होत नसल्याने नैराश्येत असलेल्या दाम्पत्याने मृत्यूला कवटाळलं आहे. या दाम्पत्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट, स्टॅम्प पेपर आणि इंस्टाग्राम व्हिडीयो देखील केला. याशिवाय अंत्यसंस्कारासाठी 75 हजार रुपये वेगळे ठेवल्याचा उल्लेख केला आहे.
जारील ऊर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिप आणि पत्नी ॲनी जारील मॉनक्रिप अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. लग्नाच्या वाढदिवशीच मॉनक्रिप दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लग्नाच्या वाढदिवशी लग्नाचे कपडे परिधान करुन परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्याने सुसाईड नोटमध्ये केला आहे.
या दोघांनी प्रेमविवाह केला होता. दोघांचा पण संसार सुखी होता. पण त्यांना मुलेबाळं नव्हते. दोघांना आयुष्यात नैराश्य आले होते. तसेच टोनी हे बऱ्याच काळापासून बेरोजगार होते. दाम्पत्यावर कर्ज देखील झाले होते. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले होते. या कारणांतून दाम्पत्याने जीवनयात्रा संपवल्याचे कारण समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून निराशेच्या गर्तेत होते. त्यांना जीवनात काहीच रस नसल्याचे त्यांनी नातेवाईकांशी बोलताना सांगितले होते. नातेवाईकांनी त्यांची अनेकदा समजूत घातली होती. दोन महिन्यांपासून दोघे आत्महत्येचा विचार करत होते.
टोनी आणि ॲनीने सोमवारी रात्री नातेवाईकांना फोन केला. त्यांची विचारपूस केली. सर्व काही सुरळीत असल्याचे भासवले. त्यानंतर रात्री उशिरा या दाम्पत्याने घरात दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. सकाळचे 10 वाजले तरी दोघेही बाहेर न दिसल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा वाजवला. पण प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून डोकावून पाहिले असता दोघेही गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले.
मॉनक्रिप दाम्पत्याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवून व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांनी अंतिम संस्कार करण्यासाठी 75 हजार रुपये ठेवले असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे. आपले राहते घर कुणाला द्यावे, याची सुद्धा नोंद त्यांनी स्टॅम्प पेपरमध्ये केली आहे. व्हिडियोमध्ये महिलेने कुणी शोक पाळू नका. कुटुंबातील लग्न कार्य व्यवस्थित होऊ द्या. आम्ही गेल्यावर दुखी होऊ नका, असा संदेश रेकॉर्ड केला आहे. या घटनेमुळे जरीपटका परिसरात एकच खळबळ उडाली आहे.