( महाड/ प्रतिनिधी )
दोन दिवसापूर्वी महाड येथे विहिरीत 6 मुलांना पाण्यात बुडून आईने मारल्याची घटना समोर आली. या घटनेचे सत्य बाहेर काढण्याचे प्रयत्न पोलीस करत असतानाच ज्या मातेने 6 मुलांना विहिरीत फेकून दिले ती माता स्वतःच पोलिसांसमोर हजर झाली आणि तिने आपल्या गुन्हयाची कबुलीही दिली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन पतीकडून होणार्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून पोटच्या 6 मुलांना विहिरीत ढकलून ठार मारल्याचे तिने सांगितले. याबाबत तिने पती विरोधातही तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तिच्या पतीवरही गुन्हा दाखल केला आहे.
मूळ उत्तर प्रदेश येथील व सध्या महाड खरवली येथे राहणार्या रुना चिखरु साहनी या महिलेने पतीसोबत झालेल्या भांडणातून पोटच्या 6 मुलांना विहिरीत फेकून देत त्यांचा जीव घेतला. त्यानंतर स्वतः पाण्यात उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न केला. असेही तिने सांगितले.
रुना हिचा पती 2010 पासून सतत चारित्र्यावर संशय घेत होता. दारुच्या नशेत तिला शिवीगाळ करत मारहाणही करायचा. 30 मे रोजीही मारहाण करत तिला घराबाहेर काढले. तू व तुझी मुले मेलात तरी मला फरक पडणार नाही, आजपासून घरात रहायचे नाही अशी तंबी दिली. त्यानंतरही ती आपल्या मुलांना घेवून घरी गेली असता पतीने घरात न घेता थेट हाकलून दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पतीच्या या त्रासाला कंटाळून शेवटी तिने हे टोकाचे पाउल उचलले.