(संगलट-खेड / इक्बाल जमादार)
ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन तर्फे कोकणरत्न बशीरभाई हजवानी यांना “फख्र-ए-इंनसानियत” हा पुरस्कार महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व मेमन जमातचे कार्यसम्राट लोकप्रिय बुजुर्ग अध्यक्ष इक्बाल ऑफिसर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन तर्फे मेमन जमातीतील तसेच मेमन जमात व्यतिरिक्त इतर मुस्लिम जमातीतील सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत कर्तव्यदक्ष तसेच विशेष प्रावीण्य प्राप्त व समाजाकरिता अमूल्य योगदान देणाऱ्या आसामींना शाल, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या AGM चे आणि पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे मेमन मुस्लिम समाज व्यतिरिक्त इतर मुस्लिम जमातीतील प्रामाणिक समाजसेवक आणि प्रामाणिक राजकारणी यांना सन्मानित करण्यात आले. इतर मुस्लिम जमातीतील अनेक कर्तबगार लोक प्रतिनिधींना गौरविण्यात आलेल्यांपैकी कोकणी मुस्लिम समाजातील कोकणरत्न बशीरभाई हजवानी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. हा सन्मान व सत्कार म्हणजे बशीरभाई बरोबर अखंड कोकणी मुस्लिम समाजाचा गौरव आणि सन्मान असल्याचे मानले जाते.
ऑल इंडिया मेमन फेडरेशन हे 570 मेमन जमातींचे फेडरेशन असून जनाब इक्बाल ऑफिसर यांची अध्यक्ष पदावर पुढील चार वर्षांसाठी चौथ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. समाजाचा नेता कसा असावा व तो समाजासाठी काय करू शकतो, हे इक्बाल ऑफिसर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे .म्हणून 80 वर्षांचे बुजुर्ग जेव्हा चौथ्यांदा अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास नकार देतात, तेव्हा अखंड मेमन जमातचे डोळे पाणावतात आणि पुन्हा पुन्हा ता-हयात त्यांना अध्यक्ष घोषित करतात. अध्यक्ष म्हणुन त्यांची कारकीर्द अतिशय उत्तम आहेच परंतू त्यांची टीम सुद्धा अतिशय प्रामाणिक आणि कर्तबगार आहे. टीमवर्कच्या माध्यमातून इक्बाल ऑफिसर यांनी मेमन समाजाला जमीनीवर पाय ठेवून आसमानाची ऊंची गाठण्याचे कौशल्य दाखवून दिले. जगातील सुशिक्षित, सुसंस्कृत, समृद्ध तसेच आर्थिकदृष्ट्या बळकट समाजामध्ये मेमन जमात अव्वल स्थानी विराजमान आहेत. मेमन समाजात घरात किंवा आपापसात मेमन भाषेतून संवाद साधतात, हे अनेक कारणांपैकी प्रमुख कारण आहे मेमन समाजाच्या प्रगतीचे व उन्नतीचे.
कोकणात जमात किंवा जमात-उल-मुस्लिमीन ही संघटना प्रत्येक मोहल्ल्यात आणि गावात सुमारे 350 वर्षांपुर्वी स्थापन झालेली असून आपल्या बुजुर्गांनी एक निजाम, एक व्यवस्था तसेच एक प्रणाली समाज जोडण्यासाठी, समाज विकसित करण्यासाठी, समाजाच्या सर्वांगीण विकासाठी तयार केली परंतु आपण या व्यवस्थेचा कसा वापर केला, हा संशोधनाचा आणि गांभीर्याने विचार करण्याचा भाग आहे.
कोकणी मुस्लिम समाजाचा शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणा दूर करण्यासाठी बशीरभाई हजवानी यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. मेमन जमात फेडरेशनच्या AGM साठी राज्यातून, देशातूनच नव्हेत तर परदेशातूनही मेमन समाज बांधव बहुसंख्यने उपस्थित होते. श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान आणि युरोप देशातून आलेले पैकी मेमन समाज बांधव त्या त्या देशात व्यापार-उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेतच, परंतू आनंदाची बाब म्हणजे त्या त्या देशात सरकारमध्ये सामील असून राजकारणात सुद्धा मोठ्या प्रमाणात उच्च स्थानावर आहेत. देशात अनेक राज्यांत महापौर, उपमहापौर तसेच पारषद म्हणुन उत्तम कामगिरी बजावत आहेत. आणि राजकारणाच्या तसेच सरकारच्या माध्यमातून मेमन जमात व समाजाचा सर्वांगीण विकास करण्यात आपलं मोलाचं योगदान देत आहेत.
श्रीलंकेतून या AGM करीता (वार्षिक सर्वसाधारण सभेत) उपस्थित सिराज युनूस मेमन, श्रीलंका सरकारमध्ये सामील असून त्यांनी आपले विचार व अनुभव कथन केले, राजकारणात आणि सरकारमध्ये उच्च पदावर राहून समाजासाठी प्रामाणिक काम करणं म्हणजे स्वतःसाठी तसेच समाजासाठी मोठ्या गौरवाची बाब आहे, राजकारणात आणि सरकारमध्ये राहून समाजासाठी प्रामाणिक कार्य करणं काळाची गरज आहे. तसेच राजकारणात आणि सरकारमध्ये समाजाचे प्रतिनीधित्व असल्याशिवाय खऱ्या अर्थाने समाजाचा सर्वांगीण विकास होणे शक्य नाही.
हज हाऊस मुंबई येथे 2000 हुन अधिक मेमन बांधव AGM (वार्षिक सर्वसाधारण सभा ) करीता उपस्थित होते. मस्तुरात मेमन जमात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्यात अग्रेसर असून पुरुष मेमन जमात बरोबर महिलांनी सामाजिक कार्यात आपल्या कृतीतून दाखवून दिलंय की महिलांना संधी मिळाल्यावर समाजासाठी प्रामाणिक रीत्या फार मोठं योगदान देऊ शकतात. यावेळी अनेक कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.