(गुहागर)
गुहागरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गुहागर तालुक्यातील वडद डफळेवाडी येथील 36 वर्षीय तरुण कोणालाही न सांगता अचानक घरातून गायब झाला. त्यानंतर त्याची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली मात्र त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर 7 दिवसांनी थेट जंगलात झाडाला टांगलेल्या स्थितीत आढळून आला. यामुळे या तरुणाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. कोणतेही व्यसन नसलेल्या आणि मोलमजुरी करून आपला संसार चालवणाऱ्या या तरुणाने अचानक हे पाऊल उचलले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
गुहागर तालुक्यातील वडद डफळेवाडी येथे राहणारे राजाराम उर्फ राजु भाग्या जोगळे असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. राजाराम घरातून कोणालाही न सांगता १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी रात्री नऊ वाजल्यापासून बेपत्ता झाला होता. तेव्हापासून त्याची शोधाशोध सगळीकडे सुरू होती. त्याचा ठावठिकाणा कुणीकडेच लागला नव्हता. अखेर १७ ऑगस्ट रोजी गुहागर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. शोधाशोध सुरु असताना अखेर 7 दिवसांनी वडद गावातील जंगलात सारंग या ठिकाणी कुंभाच्या झाडाच्या फांदीला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या स्थितीत आढळून आला.
राजाराम उर्फ राजु भाग्या जोगळे याचे चार-पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. घरी पत्नी आणि तो असे दोघांचे कुटुंब होते. या दुर्दैवी घटनेने त्याची पत्नी, नातेवाईकांना आणि गावातील ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसला असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती गुहागर पोलिसांना देण्यात आली.याची माहिती मिळताच गुहागर पोलीस ठाण्याचे हनुमंत नलावडे, विजय साळवी आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा पंचनामा केला. या सगळ्या दुर्दैवी घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गुहागर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.