(छ. संभाजीनगर)
ललित पाटीलच्या ड्रग्ज तस्करीच्या पृष्ठभूमीवर आणखी काही कारनामे उघडकीस येत असून, गुजरात पोलिसांच्या अहमदाबाद गुन्हे शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) महाराष्ट्रात संयुक्त कारवाई करून छत्रपती संभाजीनगर येथील एका कारखान्यावर छापा घातला आणि कोकेन, केटामाईन वएमडी ड्रग्ज जप्त केले. या ड्रग्जची किंमत 500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
या ठिकाणी रसायनांच्या आडून ड्रग्ज तयार केले जात असल्याचे तपासात उघड झाले. सध्या हे ड्रग्ज कुठे आणि कुणाला पुरवले जात होते, याचा तपास सुरू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज बनवणारा कारखाना आढळल्यानंतर देशातील सर्वोच्च सुरक्षा यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एका कारखान्यात कोकेन, केटामाईन आणि एमडी ड्रग्ज मोठ्या प्रमाणात तयार होत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना मिळाली होती. यानंतर दोन विशेष पथके तयार करून तपास सुरू केला.
ही माहिती खरी असल्याचे आढळून आल्यानंतर संभाजीनगर येथील या कारखान्याची खरी लिंक सापडली. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने डीआरआयची मदत घेत कारखान्यातून 200 कोटी रुपयांच्या तयार ड्रग्जसह 300 कोटी रुपयांचा कच्चा मालही जप्त केला. या प्रकरणाचे सर्व धागेदोरे जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अद्याप उघड करण्यात आली नाहीत. दरम्यान, जितेश कुमार प्रेमजी भाई हिंहोरिय याला एनडीपीएस कायदा कलम 22, 28,29 अंतर्गत अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.