(ज्ञान भांडार)
आजकाल तंत्रज्ञान खूपच प्रगत झाले आहे, दररोज आरोग्याशी संबंधित अद्ययावत मशिनरी निर्माण केली जात आहे. देशभरातील शास्त्रज्ञ निरनिराळे प्रयोग करत आरोग्य क्षेत्रात क्रांती करत नवनवीन शोध लावत आहेत. आता तर आपल्या मनोरंजनासाठी वापरला जाणाऱ्या स्मार्टफोनने आपल्या शरीरारावरील त्वचारोगांसह त्वचा-तोंडाचा कॅन्सरही शोधून काढता येणार असल्याचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. जगभरातील एकूण मृत्यूंपैकी सुमारे २% मृत्यू हे त्वचेच्या आजारांशी संबंधित आहेत. हे आजार वेळीच समजून येत नसल्याने त्यामुळे मोठे आजार बळावून ते जीवघेणे ठरत असतात. या समस्या वेळीच ओळखल्या गेल्या तर त्याची तीव्रता आणि जीवघेण्या परिस्थितीचा धोका कमी होऊ शकतो. तथापी, भारतात बहुतेक रुग्णांमध्ये, त्वचेशी संबंधित समस्यांचे वेळेत व परिणामकारक निदान होत नाही ज्यामुळे ही समस्या वाढते आहे
या बाबी लक्षात घेऊन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स)ने एक मोबाइल अॅप्लिकेशन सुरू केले असून, त्याच्या मदतीने त्वचेशी संबंधित आजार, अगदी तोंडाच्या त्वचेच्या कर्करोगाचे निदानही सहज होऊ शकते. एम्स-दिल्ली आणि स्टार्ट अप न्यूट्रिशन लॅब यांनी संयुक्तपणे हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मोबाइल अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या मदतीने त्वचारोगांची वेळीच ओळख पटवून त्यावर उपचार करण्यात मदत करता येणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तज्ञांचा असा दावा आहे की डॉक्टरांसाठी हा अनुप्रयोग त्वचेची स्थिती सहजपणे समजण्यास उपयुक्त ठरू शकतो. या अॅपविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
डर्मेड (Dermed) :
डर्मेड नावाचे हे अॅप मशीन-लर्निंग एआय-पॉवर्ड अल्गोरिदमचा वापर करून त्वचेच्या समस्या ओळखू शकते. याच्या माध्यमातून त्वचा आणि तोंडाच्या कर्करोगासह त्वचेशी संबंधित अनेक आजार सहज शोधता येतात. त्याची अचूकता प्राथमिक अभ्यासात ८० टक्क्यांपर्यंत असल्याचे दिसून आले आहे, असे एम्समधील व्हेनॉलॉजी अँड त्वचाविज्ञान विभागाचे प्राध्यापकांनी सांगितले. त्वचारोगांच्या निदानात डर्मेड नावाच्या अॅपची महत्त्वाची भूमिका असू शकते.
अॅप कसे काम करणार :
मोबाइल अॅपबाबत शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, त्याचा वापर अगदी सोपा आणि प्रभावी होऊ शकतो. त्वचेची स्थिती आणि आजारांची माहिती होण्यासाठी डॉक्टरला रुग्णाच्या शरीरावरील जखमा किंवा त्वचाविकारांचे छायाचित्र काढून क्लाउड सर्व्हरवर अपलोड करावे लागेल. अपलोड केल्यानंतर १५-३० सेकंदाच्या आत हे अॅप मशीन अॅनालिसिसवर आधारित फोटो देईल, ज्याच्या आधारे समस्या ओळखता येईल. फंगल इन्फेक्शनपासून ते एक्झामा आणि स्किन कॅन्सरपर्यंतच्या समस्या या अॅपच्या मदतीने सहज कळू शकतात.
त्वचेचा कॅन्सरही कळू शकतो :
डर्मेड अॅपबद्दल माहिती देताना डॉ. गुप्ता यांनी सांगितले, आतापर्यंत या अॅपमुळे ५० हून अधिक प्रकारचे त्वचारोग सहज ओळखता येतात. या वर्षाअखेरपर्यंत त्यात अपडेशन करून आजार ओळखण्याची क्षमता वाढविण्याचे काम केले जात आहे. सुमारे ८० टक्के अचूकतेसह मेलेनोमासह मुरुम, सोरायसिस, व्हिटिलिगो, टिनिया, एक्झामा, बेसल सेल कार्सिनोमा, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा यासारखे कर्करोग ओळखण्यास हे अॅप प्रभावी ठरले आहे, अशीही डॉ. गुप्ता यांनी माहिती दिली.
मोबाइलवरून कळणार त्वचारोग :
भारतात त्वचारोग तज्ज्ञांची कमतरता आहे, असे सांगून डॉ. गुप्ता म्हणतात की, छोट्या शहरांमधील तज्ज्ञांना सहज उपलब्ध नसल्याने लोकांना त्वचारोग ओळखणे थोडे कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत या अॅपकडे परिणामकारक यश म्हणून पाहिलं जात आहे. विशेषत: ग्रामीण भारतात, जिथे त्वचारोगतज्ज्ञ सहज उपलब्ध होत नाहीत, अशा ठिकाणी हे अॅप लोकांना त्यांच्या अनेक आजारांबाबत सावधगिरी मिळण्यास सहज निदान करण्यास मदत करेल. तसेच देशभरात अक्राळविक्राळ रूप धारण करत असलेल्या तोंडाच्या कॅन्सरचे रुग्ण वाढत असल्याने या समस्या सहज ओळखून परिस्थितीबाबत स्पष्टीकरण देण्यासाठीही या अॅपमुळे मदत होणार आहे. लवकरच हे अॅप रुग्णांच्या सेवेत दाखल होत आहे.