( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील विलोभनीय समुद्रकिनाऱ्यावर राबविण्यात येणाऱ्या सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहिमेंतर्गत रविवारी कासव मित्रांच्या विशेष सहकार्याने 47 सागरी कासवांची पिल्ले समुद्राकडे झेपावली आहेत. गणपतीपुळे येथे समुद्र किनाऱ्यावर कांदळवन दक्षिण विभाग परिक्षेत्र रत्नागिरीच्या वतीने सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहीम अंतर्गत अंडी उबवणी केंद्रामध्ये कासवांच्या संरक्षित प्रजाती तयार केल्या जात आहेत. त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या घरट्यांमधील सुमारे 47 कासवांची पिल्ले संरक्षित करण्यात आली होती. या संरक्षित पिल्लांना सुरक्षितरित्या गणपतीपुळे अंडी उबवणी केंद्रासाठी नियुक्ती करण्यात आलेले कासवमित्र वीरेंद्र सुर्वे व मालगुंड येथील कासवमित्र आदित्य मयेकर यांच्या विशेष कामगिरीने गणपतीपुळे समुद्रात सोडण्यात आले आहे.
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या अंडी उबवणी केंद्रामध्ये सुमारे 137 समुद्री कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली होती. त्यातील 47 कासवांची पिल्ले रविवारी सुरक्षितरित्या समुद्रात सोडण्यात आल्याची माहिती कासव मित्र वीरेंद्र सुर्वे यांनी दिली आहे. या अंडी उबवणी केंद्रामध्ये समुद्री कासवांची पिल्ले घरट्यांमध्ये योग्य प्रकारे संरक्षित करण्यासाठी कासवमित्र वीरेंद्र सुर्वे व मालगुंड येथील कासवमित्र आदित्य मयेकर यांच्या वतीने विशेष काळजी घेतली जात आहे तसेच समुद्री कासवांच्या प्रजाती संरक्षित करून अंड्यातून बाहेर आलेली कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यासाठी अतिशय जबाबदारीने काम केले जात आहे. त्यामुळे गणपतीपुळे व मालगुंड किनाऱ्यावर सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन व यशस्वी होत असल्याचे मत व्यक्त होत आहे.