(मुंबई)
अजित पवार यांना राष्ट्रवादीचे आणि एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळणार नाही. सध्या अजित पवार ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याचा काही उपयोग होणार नाही असा मोठा दावा जेष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी केला आहे. तर शिवसेनेचे चिन्ह आणि नाव हेही एकनाथ शिंदे यांच्या जवळ राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे .
खासदार शरद पवार आणि त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यावरून युद्ध सुरू झाले आहे. दोघांनीही एकाच दिवशी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. अशातच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या निवडणूक चिन्हावर दावा सांगणारी याचिका दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आळायची आणि सुमारे ४० आमदार, खासदारांच्या समर्थनाचे प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाकडून भारतीय निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली आहेत. शरद पवार गटाकडून यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे कॅव्हिएट दाखल करण्यात आले आहे.
त्यानंतर निवडणूक आयोगाने काही महिन्यांपूर्वी ज्या आधारावर शिवसेनेची धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली, त्यानुसारच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना मिळेल अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली. ही चर्चा सुरु असताना जेष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी एक मोठा दावा केला. सिब्बल यांनी ‘द वायर’शी बोलताना म्हटले की, अजित पवार यांना राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळणार नाही. अजित पवार ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याचा काही उपयोग होणार नाही.
या मुलाखतीत बोलताना कपिल सिब्बल यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे की, शिवसेनेचे चिन्ह आणि नावही एकनाथ शिंदे यांच्या जवळ राहणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल देताना म्हटले आहे की, विधानसभेतील किंवा संसदेतील सदस्यांच्या संख्येवर पक्ष कोणाचा हे ठरवले जाऊ शकत नाही. त्यासाठी संघटनेत कोणाचे बहुमत आहे, हे पहिले पाहिजे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांना चिन्ह देताना निवडणूक आयोगाने जो आमदारांच्या संख्येचा आधार घेतला आहे, तो आता संपला आहे. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे यांना लवकरच मिळू शकते, असंही सिब्बल म्हणाले. या प्रमाणेच केवळ आमदारांच्या संख्येवर अजित पवार यांना राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह घड्याळ हे मिळणार नसल्याचं कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केलं आहे.