(रत्नागिरी)
मागील काही दिवसांपासून रत्नागिरी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे शहरातील इंधन पंपांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. विशेषतः सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यासाठी दिवसा तसेच रात्रीही रांगा लागलेल्या बघायला मिळत आहेत.
रत्नागिरीतील जेके फाईल नजीक एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या सीएनजी स्टेशनसह रेल्वे स्टेशन समोरील माने पेट्रोल पंपात देखील पर्यावरण पूरक सीएनजी गॅस वरून घेण्यासाठी पर्यटकांसह स्थानिक वाहनधारकांच्या रांगा लागलेल्या आहेत.
जेके फाईल्स कंपनी समोरील सीएनजी रिफील पंपासमोर सीएनजी आधारित रिक्षांसाठी स्वतंत्र रांग आहे. एमआयडीसी कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच यामुळे वाहनांची गर्दी होत आहे. मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सीएनजी भरून घेण्यासाठी उभ्या असलेल्या रिक्षांसाठी सीएनजी पंपानजीकच्या अंतर्गत रस्त्यावरही रिक्षाची रांग लावली जात आहे.
मागील काही दिवसांपासून रत्नागिरी तसेच आजूबाजूची पर्यटन स्थळे पाहण्यासाठी बाहेरून मोठ्या प्रमाणावर पर्यटक आलेले आहेत. उन्हाळी सुट्टीमुळे लोक लहान मुले तसेच कुटुंबीयांसह रत्नागिरीच्या पर्यटन भेटीवर आलेले आहेत. त्यामुळे सहाजिकच पर्यटकांच्या वाहनांची गर्दी इंधन भरून घेण्यासाठी पाहायला मिळत आहे.