(नवी दिल्ली)
मार्चच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (डीए) आणि सेवानिवृत्तांसाठी ‘डीआर’ भत्ता ४ टक्क्यांनी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार ४६टक्के डीए / डीआर मिळत आहे. पुढील महिन्यापर्यंत हा भत्ता आणखी ४ टक्क्यांनी वाढणार आहे. महागाई भत्त्याचा दर ५० टक्क्यांवर पोहोचताच सरकारला आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा गांभीर्याने विचार करावा लागेल.
सी. श्रीकुमार, स्टाफ-साईड नॅशनल कौन्सिल (जेसीएम) चे सदस्य आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन (एआयडीईएफ) चे सरचिटणीस यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांचा डीए दर ५० टक्क्यांपर्यंत पोहोचताच आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केंद्र सरकारपुढे ठेवली जाईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा करू शकते. या वर्षी डीएचे दर ४ टक्क्यांनी वाढू शकतात. तसे झाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन सुधारले जाईल. श्रीकुमार यांच्या म्हणण्यानुसार, सातव्या वेतन आयोगाने केंद्रात ‘पे’ रिव्हिजन दर १० वर्षांनीच व्हायला हवे, अशी शिफारस केली होती, त्याची गरज नाही. यासाठी प्रतीक्षा करण्याची गरज नाही, मात्र वेतन आयोगाची स्थापना केव्हा आणि किती कालावधीनंतर करावी, याबाबत वेतन आयोगाने स्पष्ट व्याख्या दिलेली नाही.