(लांजा)
२१ वर्षीय तरुणीने राहत्या घरी साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कणगवली गावकरवाडी येथे गुरुवारी १३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत घडली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तरुणीच्या आत्महत्येमागील कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कणगवली गावकरवाडी येथील मनोज शंकर तिखे (१९ वर्षे) याने या घटनेबाबतची खबर लांजा पोलिसांना दिली. या घटनेत मयत झालेली कोमल शंकर तिखे (२१ वर्षे) ही आपले आई-वडील आणि भाऊ यांच्यासह कणकवली गावकरवाडी येथे राहते.
तिखे कुटुंबीय हे काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. तर काजूच्या झाडांची देखभाल करण्यासाठी कोमल हिला घरीच ठेवण्यात आले होते. मंगळवारी ४ एप्रिल रोजी कोमलचा भाऊ मनोज तिखे हा आपले आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुंबईहून कणगवली गावी आला होता. त्यानंतर दोघेही घरात राहत होते. गुरुवारी १३ एप्रिल रोजी मनोज तिखे हा आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लांजा येथे आला होता. आधार कार्ड अपडेट करून तो दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास परत घरी गेला. त्यानंतर दुपारी ३ वाजता मनोज गावचे गावकर राजेश इंगळे यांच्याकडे थांबला होता.
सायंकाळी ६ वाजता तो तिथून निघून घरी आला. त्यावेळी त्याला आपल्या घराचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे मनोज याने बहीण कोमल हिला हाका मारून आवाज दिला. मात्र तिने कोणताच प्रतिसाद न दिल्याने भाऊ मनोज तिखे याने तिच्या मोबाईल नंबरवर कॉल केला. मात्र तिने मोबाईल उचलला नाही. त्यानंतर भाऊ मनोज हा घराच्या पश्चिम दिशेला असलेल्या खिडकीजवळ गेला आणि खिडकी उघडून आतमध्ये डोकावून पाहिले. यावेळी बहीण कोमल हिने घराच्या हॉलमधील लाकडी बाराला साडीने गळफास लावून घेतल्याचे भाऊ मनोजला दिसून आले. यावेळी कोमल लोंबकळत असलेल्या अवस्थेत मनोजला आढळून आली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्विनी पाटील अन्य पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची लांजा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हेड.कॉन्स्टे. श्रीकांत जाधव हे करत आहेत.