(खेड)
तालुक्यातील आंबवली म्हाळुंगे येथील शासकीय जमीन कमी किमतीत मिळवून देण्याचे भासवून बनावट सातबारा बनवून एका दाम्पत्याची ३२ लाख १६ हजार १०० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी संशयिताविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल अंकुश राणे (रा. आंबवली, ता. खेड) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना २०१४ ते २०२३ या दरम्यान घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित अनिल राणे यांनी महाळुंगे, आंबवली, ऐनवली व बरवली येथील जागा विक्री करणार असल्याचे सांगितले. या जागा विकत घेण्यासाठी एका दाम्पत्याने ३१ लाख ८४ हजार १०० रुपये संशयिताला ऑनलाईन दिले तसेच आंबवली, ऐनवली आणि वरवली या सर्व शासनाच्या जागा कमी किंमतीत मिळवून देतो, या जमिनीचे रजिस्ट्रेशन करण्याची काही गरज नाही, असे संशयिताने खोटे सांगून बनावट हस्तलिखित सातबारे दाम्पत्याला दिले.
बनावट नोटीस देऊन फिर्यादींची एकूण ३२ लाख १६ हजार १०० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी दाम्पत्याने खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.