( संगमेश्वर / प्रतिनिधी )
एखादं आव्हान पेलायचं म्हटलं, की आवश्यक असते, ती जिद्द, चिकाटी आणि अफाट मेहनत करण्याची तयारी. अस्वस्थ वृत्ती कर्तृत्वला जन्म देते असं नेहमी म्हटलं जातं. कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना, जो वेगळी वाट चालण्याची महत्वाकांक्षा ठेवतो, तोच जिद्दीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पुढं जाण्यात यशस्वी होतो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्ली येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात मराठीचा जल्लोष आणि आगळावेगळा जागर करण्यासाठी पुणे येथील चपराक प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटील यांनी साहित्य विश्वात काहीतरी संस्मरणीय काम करायचं ठरवलं. गत दोन महिन्यात दिवस रात्र एक करुन चपराक प्रकाशनने राज्याच्या कानाकोपऱ्यातील विविध लेखकांची विविध विषयांवरील ३१ पुस्तकं तयार केली असून दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान संपन्न होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात विविध मान्यवरांच्या हस्ते या ३१ पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. एका प्रकाशनाने केवळ दोन महिन्यांच्या कमी कालावधित एवढी पुस्तकं तयार करुन प्रकाशित करणं हा मराठी साहित्यातील एक विक्रम मानला जात आहे.
लातूर जिल्ह्यातून लेखन क्षेत्रात आपलं नशीब अजमावण्याच्या उद्देशाने घरातून पळून आलेल्या घनश्याम पाटील यांनी वर्तमानपत्रात काम करण्याची संधी मिळण्यासाठी प्रसंगी फुटपाथवर राहणे देखील पसंत केले. वर्तमानपत्रात काम करता करता सडेतोड वृत्त प्रसिद्ध करणारा युवा पत्रकार म्हणून त्यांचं नाव घेतलं जाऊ लागलं. मात्र परखड लिहिणारा पत्रकार एकाच वर्तमानपत्रात अधिक काळ काम करू शकत नाही हे सर्वश्रुत आहे. याच कारणाने काही मतभेदानंतर पाटील यांनी वर्तमानपत्रातील आपली बातमीदारी सोडून दिली. असं असलं तरी त्यांची लेखनाजवळ असलेली नाळ अधिक बळकट झाली होती. संपादकीय लेख लिहिणे, काही राजकीय घडामोडी वर लिहिणे असे लेखन त्यांच्या हातून सातत्याने सुरू होते. असं असलं तरी स्वतःचं असं काहीतरी प्रकाशन असायला हवं याच हेतूने त्यांनी पुणे येथे ‘ चपराक ’ या नावाने स्वतःची प्रकाशन संस्था सुरू केली. प्रकाशन संस्था सुरू करणे सोपं असतं मात्र ती चालवणं वाटतं इतकं सोपं नाही. परिणामी या कालावधीत त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. येणाऱ्या सर्व संकटांचा धीराने सामना करत त्यांनी हळूहळू पुस्तकांचे प्रकाशन सुरू केले.
दर्जेदार लेखनाला महत्त्व देणारा संपादक अशी घनश्याम पाटील यांची ओळख तयार झाली. यातूनच नवनवीन लेखकांची चपराकने प्रकाशित केलेली पुस्तके चांगलीच गाजली. चपराकने प्रकाशित केलेली सागर कळसाईत या युवा लेखकाने लिहिलेले कॉलेज गेट या कादंबरीने विक्रीचा एक लाखाचा टप्पा ओलांडला. यानंतर मात्र चपराकने कधीही मागे वळून पाहिले नाही. पुस्तक प्रकाशित करून घेण्यासाठी चपराककडे लेखक मंडळींच्या अक्षरश: रांगा लागल्या. दर्जेदार चपराक मासिक विशेषांकाने राज्यभर पोहोचून वाचकांच्या मनात घर केले. बालकुमारांसाठी साहित्याची असलेली वानवा लक्षात घेऊन चपराकने आपले लाडोबा नावाने एक भावंड साहित्यात कार्यरत केलं. अल्पावधीतच लाडोबा मासिक मुलांमध्ये कमालीचं वाचनप्रिय झालं.
गेल्या दोन महिन्यात विविध विषयांवरील आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील विविध लेखकांची ३१ पुस्तक चपराक प्रकाशित करत आहे. यामध्ये मासिक ‘साहित्य चपराक’ : साहित्य संमेलन विशेषांक, पुस्तकानुभव – प्रा. दिलीप फडके, ऋतुरंग – जे. डी. पराडकर, मंतरलेले दिवस – जे. डी. पराडकर, देदीप्यमान शलाका – सुरेखा बोर्हाडे, मनापासून – डॉ. राजेंद्र माने, सावट – काशिनाथ माटल, अवचिता परिमळू – डॉ. मेधा गोसावी-कुलकर्णी, मृत्युपश्चात – चंद्रलेखा बेलसरे, रॅगिंगचे दिवस – सुहास कोळेकर, शिक्षणाचे प्रश्नोपनिषद – संदीप वाकचौरे, शिक्षणनामा – संदीप वाकचौरे, शिक्षणाचिये द्वारी – संदीप वाकचौरे, शिक्षणावर बोलू काही – संदीप वाकचौरे, चक्र व इतर नाटके – डॉ. सोमनाथ मुटकुळे, निवडुंग व इतर नाटके – डॉ. सोमनाथ मुटकुळे, राजर्षी व इतर नाटके – डॉ. सोमनाथ मुटकुळे, परिणीता – डॉ. बी. व्ही. कुलकर्णी, पुन्हा एकदा लंडन – हिरालाल पगडाल, १०१ बिमारियां : योग और प्राकृतिक चिकित्सा – डॉ. राजेंद्र वामन, लालबत्ती ते कारंबा – आशिष निनगुरकार, सोनचाफा – अनंत घोगले, गुर्रर्र आणि म्यांव – आनंद देशपांडे, प्रवास कवितेचा – रवींद्र कामठे, लोकनायक महाराजा सयाजीराव गायकवाड (ब्रेल) – चंद्रलेखा बेलसरे, लाडोबा प्रकाशन – चरित्रस्मरण – भगवान अंजनीकर, खारुताईचे जंगल – डॉ . कैलास दौंड, रत्नजडित खंजिराचे रहस्य – संजय सोनवणी, बारीकसारीक गोष्टी – शिरीष पद्माकर देशमुख, क्रांतिकारक सरदार भगतसिंह – जनार्दन देवरे, पाखरांची गाणी – राजेंद्र दिघे या पुस्तकांचा समावेश आहे. पुस्तक मागवण्यासाठी संपर्क – ७०५७२९२०९२
▪️ दर्जेदार साहित्याला न्याय देण्याचा प्रयत्न !
चपराककडे येणारे लेखक आपलं दर्जेदार साहित्य घेऊन येत असतात. जे साहित्य दर्जेदार आहे ते नक्की छापले जाणार याबाबत आपण ठाम असतो. दर्जेदार साहित्याला न्याय देण्याचा प्रयत्न आजवर चपराकने कायमच केला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्ली येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशानेच गत दोन महिन्यात चपराकने ३१ पुस्तकं प्रकाशनासाठी सज्ज केली आहेत. यासाठी चपराक समूहाने अहोरात्र घेतलेली मेहनत आपण कधीही विसरू शकत नाही. वाचक या सर्व पुस्तकांचं नक्कीच स्वागत करतील असा मला विश्वास आहे.— घनश्याम पाटील, संपादक चपराक प्रकाशन