( रत्नागिरी )
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया चालू असून त्यामध्ये सुगम, दुर्गम भागातील शाळांची यादी बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रीयाच झालेली नव्हती. अनेक शिक्षक दुर्गम भागातील शाळांमध्येच अडकून पडले आहेत. अनेक शिक्षकांकडून बदली प्रक्रिया राबवली जावी अशी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. ग्रामविकास विभागाकडून प्राप्त आदेशानुसार शिक्षण विभागाला 31 मे पर्यंत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यासाठी दुर्गम शाळांची यादी बनविण्याचे काम गेले दोन महिने सुरु आहे. अति पावसाचा प्रदेश, मुख्य रस्त्यापासून दहा किलोमीटर दुरवर असलेले रस्ते, डोंगराळ भाग, मनुष्यावर हिंस्त्र पशुंचा हल्ला झालेली गावे, मोबाईलला रेंज नसलेली गावे या निकषात बसणार्या गावांतील शाळांचा समावेश दुर्गम मध्ये करावयाचा आहे. तशी माहिती त्या-त्या विभागाकडून मागविण्यात आली होती. त्यानुसार दुर्गम भागातील शाळांची प्राथमिक यादीही निश्चित केली गेली. त्यामध्ये 544 शाळांचा समावेश केला होता. या शाळांमध्ये हिंस्त्र प्राण्यांकडून मनुष्यावर हल्ला करण्यात आलेल्या परिसरातील 21 शाळा आहेत.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी बदली प्रक्रियेचा नुकताच आढावा घेतला. त्यावेळी हिंस्त्र पशुंकडून मनुष्यावर झालेला हल्ला याबरोबरच पाळीवर पशुंवर सातत्याने हल्ला होत असलेल्या गावांची यादी संबंधित विभागाकडून मागविण्याच्या सुचना केल्या आहेत. ती यादी आल्यानंतर त्या गावांचाही दुर्गम भागातील शाळांसाठी विचार करण्यात येणार आहे. जिल्ह्यात बिबट्याचा वावर आणि पाळीव प्राण्यांवर हल्ला झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे दुर्गम शाळांची यादी वाढू शकते. ही माहिती येत्या आठ दिवसांमध्ये शिक्षण विभागाकडे सादर करावयाची आहे.
दुर्गम शाळांमधील शाळा ठरवताना मनुष्यावरील हिंस्त्र पशुंच्या हल्ल्यावरील घटनांबरोबर पाळीवर प्राण्यांवरील हल्ल्यांच्या गावांचाही समावेश करावा अशी सुचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत. त्यामुळे दुर्गम शाळांची यादीत शाळांची वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या बनविण्यात आलेल्या यादीत जिल्ह्यातील साडेपाचशे शाळांचा समावेश आहे.