आर्थिक व्यवहारासाठी मार्च महिना महत्वपूर्ण मानला जातो. या महिन्यामध्ये करदात्यांना कर भरावा लागतो. मार्च महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा स्थितीत सरकारने काही कामांसाठी मुदत दिली आहे. ती कामे वेळेत पूर्ण करणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ३१ मार्च ही अनेक वेळा काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत असते. या महिन्यात अनेकजण बँकेसंबंधी किंवा इतर संस्थांसंबंधित मोठे आर्थिक व्यवहार करत असतात. तसेच एप्रिल महिन्यापासून भारताचे नवीन आर्थिक वर्ष सुरु होते. या महिन्यात आपल्याला अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहेत. यापैकी एक काम म्हणजे पॅनला आधारशी लिंक करणे. आपण हे काम 31 मार्च 2023 पर्यंत न केल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल.
आधार-पॅन लिंक
तुम्ही अजून तुमचा पॅन आधारशी लिंक केला नसेल, तर ते लवकर पूर्ण करा. तुम्ही 31 मार्च 2023 पर्यंत पॅनला आधारशी लिंक न केल्यास पॅन निष्क्रिय होईल. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) 30 जून 2022 पासून पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी 1000 रुपये विलंब शुल्क आकारत आहे.
कर बचत गुंतवणूक
आर्थिक वर्ष 2022-23 साठी अद्याप कर गुंतवणूक केली नसेल तर ती लवकरच करा. तुम्ही पीपीएफ (PPF), सुकन्या समृद्धी योजना, पाच वर्षांची एफडी आणि ईएलएसएस (ELSS) मध्ये गुंतवणूक करून कलम 80C कर सूट मिळवू शकता. यासाठी 31 मार्चपर्यंत या योजनेत गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्हीही करदाते असाल तर तुम्ही ३१ मार्चपूर्वी कर वाचवण्यासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये पैसे गुंतवू शकता. तसेच राष्ट्रीय पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना यासारख्या योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास कराची काही रक्कम वाचवू शकता.
पीएम वय वंदना योजनेत गुंतवणूक
कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना पीएम वय वंदना योजनेत गुंतवणूक करायची असेल तर ते 31 मार्च 2023 पर्यंतच करू शकतात. या योजनेची मुदत वाढवण्यासाठी सरकारने कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. अशा परिस्थितीत तुम्ही मार्चपर्यंतच यात गुंतवणूक करू शकता. ही 60 वर्षे आणि त्यावरील नागरिकांसाठी पेन्शन योजना आहे.
एसबीआयच्या अमृत कलश योजनेत गुंतवणूक
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची नवीन मुदत ठेव योजना अमृत कलशची मुदत या महिन्यात संपणार आहे. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के तर इतरांना 7.1 टक्के व्याज दिले जात आहे. या मुदत ठेव योजनेत 400 दिवसांसाठी गुंतवणूक करावी लागेल.
म्युच्युअल फंडात नामांकन
तुम्ही म्युच्युअल फंडात नॉमिनेशनची प्रक्रिया अजून पूर्ण केली नसेल, तर हे काम लवकरात लवकर करा. यासाठी सर्व फंड हाऊसेसने 31 मार्चची मुदत दिली आहे. तुम्ही असे न केल्यास तुमचे म्युच्युअल फंड खाते गोठवले जाऊ शकते.
बँकेसोबत केवायसी अपडेट करा
केंद्र सरकारकडून बँक खातेधारकांना ३१ मार्चपर्यंत व्यवहारांमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून KYC अपडेट करण्यास सांगितले आहे. ३१ मार्चपर्यंत KYC अपडेट करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.
आगाऊ कर भरणे
भारताच्या आयकर कायद्यानुसार, अनुमानित उत्पन्नाच्या आधारावर आगाऊ कर भरण्याची तरतूद आहे. अनुमानित उत्पन्नाच्या आधारे कर दायित्व 10,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास, अशा करदात्याने आगाऊ कर भरणे आवश्यक आहे.
पहिला हप्ता १५ जून १५%
दुसरा हप्ता १५ सप्टेंबर ४५%
तिसरा हप्ता 15 डिसेंबर 75%
चौथा 15 मार्च 100%
प्रलंबित कर भरा
जर ती व्यक्ती कर भरण्यास पात्र असेल तर, लवकरात लवकर प्रलंबित पेमेंट करून कराची थकबाकी भरावी. जर ३१ मार्चनंतर कर भरण्यास दंड आकाराला जातो.