(सोलापूर)
भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे सर्वेसर्वा आणि तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्यावर आले आहेत. ते सोलापूरला पोहोचले. आषाढी एकादशीचे निमित्त साधून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करू इच्छिणार्या बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखरराव यांनी तर आपले सगळे सरकारच पंढरपूरला आणले आहे. या दौर्यात ते देवदर्शन आणि राजकारणासह अनेक गोष्टी साधणार आहेत. मात्र, या दौर्याचा थाटमाट महाराष्ट्रातील लोकांचे डोळे दीपवणारा आहे. त्यांच्याबरोबर तेलंगणचे मंत्रिमंडळ आणि सर्व आमदारांच्या लवाजम्यासह 300 मोटारींचा ताफा आहे. या दौर्याच्या निमित्ताने केसीआर जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. त्यांच्या या दौर्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापणार असल्याचे दिसत आहे. भाजप, काँग्रेस, ठाकरे गट या सगळ्याच पक्षांनी राव यांच्या दौर्याची दखल घेतली आहे.
सोमवारी राव यांचा हा दौरा सुरू झाला. राव सकाळी हैदराबाद येथून रस्तामार्गे दुपारी उमरग्याला पोहोचले. उमरगा येथे जेवण करून संध्याकाळी ते सोलापूरला पोहोचले. त्यांच्याबरोबर 300 वाहनांचा ताफा होता. राव यांच्या स्वागतासाठी दर दहा किलोमीटरवर ‘देश का नेता, किसन का भरोसा’ अशी पोस्टर लावण्यात आली होती. सोलापूरच्या मार्केट यार्ड येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सोमवारी रात्री पोटगी रोड, आसरा चौक येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. या मुक्कामात त्यांनी काही उद्योजकांशी संवाद साधला.
आज मंगळवारी सकाळी राव पंढरपुरला रवाना होणार आहेत. त्यानंतर ते विठ्ठलाची पूजा करणार आहेत. यावेळी बीआरएसकडून मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. हिंदू राष्ट्र सेना या संघटनेने मात्र राव यांच्या मुख्यमंत्री म्हणून विठ्ठल पूजेलाही विरोध केला आहे. राव यांनी लवाजम्यासह दर्शन न घेता सामान्य भाविक म्हणून दर्शन घ्यावे, असा या संघटनेचा आक्षेप आहे. पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर राव सरकोली येथे जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर हे तुळजापूर येथे जाऊन तुळजाभवानी मातेचेदेखील दर्शन घेणार आहेत. तसेच ते तिथल्या हस्तमाग व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत.
महाराष्ट्रातील राजकारणात प्रवेश केल्याची घोषणा केल्यानंतर राव यांचा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यावर भर दिला आहे. राज्यातील अनेक माजी आमदार हे बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु सध्या तरी पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे त्यांच्या बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत.
राव यांच्या दौर्यावर महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, बीआरएसची नियत चांगली नाही. त्यांनी ठरवायला हवे की, कुणाला मदत करायची. ते एकीकडे म्हणतात, देशात हुकूमशाही आहे. मोदी सरकार आम्हाला राज्यात काम करू देत नाही. आमच्या नेत्यांवर ईडी, सीबीआयच्या धाडी पडतात. आम्ही हुकुमशाहीविरोधात लढतो आहोत. मात्र, तेलंगणात राव यांना भाजपचा विरोध नाही. तिथे त्यांच्यापुढे काँग्रेसचे आव्हान आहे. यातून भाजपने दबावाचे राजकारण सुरू केले असेल, तर हे धोकादायक आहे. परंतु भाजपने सोडलेले मोहरे किंवा घोडे यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना किती मते पडतील, हा पुढचा प्रश्न आहे. त्यांची आर्थिक ताकद मोठी आहे. त्यांनी राज्यात पैशांचा खेळ सुरू केला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही बीआरएस यांच्यावर टीका करताना प्रतिक्रिया दिली की, बीआरएस ही भाजपची बी टीम असून, महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला माहीत आहे. तेलंगणात बीआरएस पक्षाला मोठे खिंडार पडले असून, त्यांचे अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. तेलंगण पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा आहे. तेलंगणात केसीआर यांच्या पक्षाने काय केले याची सर्व माहिती काँग्रेसकडे आहे. लवकर या फसव्या तेलंगणा पॅटर्नची पोलखोल करू.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, महाराष्ट्रात बीआरएसला स्थान मिळेल की नाही, हे भविष्यात कळेल, अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे. तर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, महाराष्ट्र हा प्रगल्भ विचारांचा आहे. असे किती येतात आणि किती जातात. या मातीत अनेकांनी पाय रोवण्याचा प्रयत्न केला. आम आदमी पार्टी (आप) देखील धडपड करत आहे. इतर कोणीही येऊ दे, अगदी बीआरएस आला तरी भाजपला काही फरक पडणार नाही.