(किशोर गावडे / मुंबई)
सुमारे 30 लाख रुपयांचे 119 चोरी आणि गहाळ झालेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर रोजी परत करण्यात आले..भांडुप पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमांत संबंधित मोबाईल परत करण्यात आले. लवकरच अन्य मोबाईल हस्तगत करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कामगिरीचे परिमंडळ 7 चे पोलीस उपायुक्त पुरूषोत्तम कराड व सहाय्यक पोलीस आयुक्त जितेंद्र आगरकर या वरिष्ठांकडून भांडुप पोलिसांचे कौतुक करण्यात आले आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यांत भांडुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांचे मोबाईल चोरी, तर काहींचे मोबाईल गहाळ झाले होते. याप्रकरणी मोबाईल चोरीसह हरविल्याची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक अनिल जायकर, पोलीस उप निरीक्षक अभिजीत टेकवडे,एएस.आय नागेश दरेकर, पोलीस हवालदार नाथू कचरे, बाळू कोळी, अनिकेत आटपाडकर, संदीप लुबाळ,जयवंत मोरे व अन्य पोलीस पथकाने मुंबईसह इतर राज्यातून चोरीसह गहाळ झालेले 30 लाख रुपयांचे 119 मोबाईल हस्तगत केले . संबंधित मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना एका कार्यक्रमां दरम्यान परत करण्यात आले. यावेळी महिला एपीआय बोधे , महिला पोलीस निरीक्षक जगताप व अन्य पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोबाईल मालकांनी भांडुप पोलिसांचे आभार व्यक्त केले .
इतर मोबाईलची माहिती काढण्यात पोलिसांना यश आले असून, लवकरच ते मोबाईल हस्तगत करुन त्यांच्या मालकांना परत करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.