(संगमेश्वर)
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे प्रशासन सदैव तत्पर असून रेल्वे गाड्यांना दिले जाणारे थांबे हे रेल्वे बोर्डाच्या अखात्यारीतील विषय असून सर्व दृष्टीने विचार करून संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात 9 पैकी 3 गाडयांना थांबा मिळण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन सकारात्मक असल्याचे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांनी सांगितले.
निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या मागणी संदर्भात संगमेश्वर चिपळूण चे आमदार श्री शेखर निकम यांच्या माध्यमातून आज कोकण रेल्वे चे व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा, आणि निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर या ग्रुपचे शिष्टमंडळ यांच्यात संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीसाठी आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेतला होता. शिष्टमंडळात ग्रुप चे प्रमुख संदेश जिमन, समीर सप्रे, दीपक पवार, संतोष पाटणे, सुशांत फेपडे, अशोक मुंडेकर आदिचा सहभाग होता. तर यावेळी कोकण रेल्वे प्रशासनाचे थांब्याशी संबंधित सर्व अधिकारी वर्गही उपस्थित होता.
सभेचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन समीर सप्रे केले. ग्रुपतर्फे मागणी करण्यात आलेल्या 9 गाड्यांच्या थांब्याविषयी प्रशासनाने आपली बाजू मांडली आणि गाडयांना देण्यात येणारा थांबा हा रेल्वे बोर्डाच्या हातात असून त्याला अनेक निकष आहेत. असे असतानाही कोकण रेल्वे प्रशासन रेल्वे बॉर्डकडे सक्षम पणे पाठपूरवा करून 9 पैकी किमान 3 गाड्यांना थांबा मिळवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करेल. आगामी काळात या 3 गाडयांना थांबा मिळेल त्यासाठी आपण व्यक्तिगत पातळीवर देखील प्रयत्न करू असे आश्वासन श्री संतोष कुमार झा यांनी यावेळी दिले.
गाड्यांच्या थांब्याच्या व्यतिरिक्त इतरही अनेक समस्यावर यावेळी चर्चा झाली. संगमेश्वर ला देण्यात आलेला कमी तिकिटंचा कोटा किंवा फलाट क्रमांक 2 वर मंडगाव च्या दिशेने पूल बांधण्याची मागणी याविषयी या बैठकीत चर्चा झाली. या सर्वच समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन श्री झा यांनी यावेळी दिले
आमदार श्री शेखर निकम यांच्या मागण्या…
वंदे भारत ला चिपळूण थांबा, रत्नागिरी दिवा रत्नागिरी गाडीला गणपतीसाठी हमरापूर थांबा देण्याची प्रमुख मागणी यावेळी आ शेखर निकम यांनी केली. या मागण्याही सकारात्मक दृष्टीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन श्री. झा यांनी दिले..
संगमेश्वर मध्येच या तीन गाड्याना थांबा मिळण्याची शक्यता
1) 110099/11000 LTT मडगांव LTT एक्सप्रेस
2) 19577/19578 जामनगर तिरुनलवेली एक्सप्रेस
3)20909/20910 कोच्चीवली पोरबंदर एक्सप्रेस
व्यवस्थापकीय संचालक यांचेबरोबर झालेली आजची चर्चा हि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, या बैठकीचे पूर्ण श्रेय हे आमदार शेखर निकम सरांचे आहे. त्यांच्यामुळेच आज संगमेश्वर वासियांना न्याय मिळेल अशी अशा निर्माण झाली आहे. श्री झा व श्री निकम सरांचे विशेष आभार मानतो अशा शब्दात भावना व्यक्त करून श्री संदेश जिमन यांनी येत्या 15 ऑगस्ट रोजी होणारे लक्षणिक उपोषण स्थगित करण्यात आल्याची घोषणा केली