(मुंबई/किशोर गावडे)
रिक्षाचालक हरिश्चंद्र रामप्रसाद जयस्वाल हे सोमवार (दि.10 ऑक्टोबर) रोजी मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. मागील 3 वर्षापूर्वी 10 मार्च 2020 रोजी पासून विवाहित जितेंद्र (वय वर्ष 33) बेपत्ता झाल्यानंतर रेल्वे स्थानक प्रशासन व स्थानिक पोलीस प्रशासनाशी सातत्याने पत्रव्यवहार करूनही व वेळोवेळी पोलीस ठाणे व रेल्वे स्थानक प्रशासनाला प्रत्यक्ष भेटी देऊन अद्यापही जितेंद्र या मुलाचा शोध न लागल्यामुळे मुलाचा घातपात घडवून आणला आहे का? संशयित मित्रांची नावे देऊनही पोलीस साधी चौकशी करण्याचे सौजन्य का दाखवत नाहीत ? असा आरोप हरिश्चंद्र रामप्रसाद जयस्वाल यांनी केला आहे.
10 मार्च 2020 रोजी होळी खेळण्यासाठी जितेंद्रचे मित्र त्याच्या भांडुपच्या राहत्या घरी त्याला कळवा येथे नेण्यासाठी आले होते. त्यानंतर ते कळवा येथे गेले व रात्री 12.30 च्या दरम्यान मित्रांसोबत निघाले. मात्र त्यानंतर अद्यापही त्याचा पुढे शोध लागलेला नाही. त्याच्या चार मित्रांनीच त्याचा घातपात केला असावा, असा थेट आरोप जितेंद्रच्या आई-वडिलांनी केला आहे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
सदर प्रकरण सीबीआय, सीआयडीकडे द्यावे. या मागणीसाठी जितेंद्रचे वडील हरिश्चंद्र रामप्रसाद जयस्वाल सपत्नीक सोमवारी आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत.