(मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची सुनावणी सुरू असली तरीही एकनाथ शिंदे हेच 2024 पर्यंत मुख्यमंत्रिपदी कायम राहतील आणि ते आपला कार्यकाळ पूर्ण करतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाने चांगला विजय संपादन केला आहे. ‘भाजपाचा विजय’ हे सत्य आता स्वीकारायला पाहिजे. पण त्यांचा विजय का झाला आणि कसा झाला, याचे बारकावे आल्यानंतर यावर भाष्य करता येईल. अजूनही केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाइटवर संपूर्ण माहिती दिलेली नाही. पण या निवडणुकीत भाजपाचे पतन होईल, असे बोलले जात होते. ते वस्तुस्थितीला धरून नव्हते. काँग्रेसने कर्नाटकातील विजयाचा धडा लक्षात घेतला नाही. फक्त यश डोक्यात ठेवले, अशी टिप्पणी त्यांनी केली.
तीन राज्यातील पराभवामुळे इंडिया आघाडीत काँग्रेसची वाटाघाटी करण्याची ताकद कमी होईल का? या प्रश्नावर, काँग्रेसची राजकीय युती फक्त राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव आणि जदयुच्या नितीश कुमार यांच्याबरोबर होती. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्याबरोबर युतीची चर्चा होणार होती. त्यामुळे काँग्रेसची ताकद कमी होईल असे म्हणता येणार नाही, असेही आंबेडकर म्हणाले.