(मुंबई)
आता आर्थिक वर्ष 2022-23 संपायला फक्त १ दिवस उरला आहे. या एका दिवसांमध्ये तुम्हाला कर गुंतवणूकीसाठी 7 महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहेत. हे काम न केल्यास समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
1. कर बचत गुंतवणूक
आर्थिक वर्ष 2022-23 साठी तुम्ही अद्याप कर गुंतवणूक केली नसेल तर ती लवकरच करा. तुम्ही पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, 5 वर्षांची एफडी आणि ELSS इत्यादींमध्ये गुंतवणूक करून कलम 80C अंतर्गत कर सूट मिळवू शकता. यासाठी तुम्हाला 31 मार्चपर्यंत अशा योजनेत गुंतवणूक करावी लागेल.
2. पीएम वय वंदना योजनेत गुंतवणूक
कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना पीएम वय वंदना योजनेत गुंतवणूक करायची असेल तर ते 31 मार्च 2023 पर्यंतच करू शकतात. ही योजना पुढे नेण्यासाठी सरकारने कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. अशा परिस्थितीत तुम्ही मार्चपर्यंतच यात गुंतवणूक करू शकता. ही 60 वर्षे आणि त्यावरील नागरिकांसाठी पेन्शन योजना आहे.
3. किमान रक्कम जमा करा
तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्येही गुंतवणूक करत असाल तर या खात्यात 31 मार्चपर्यंत किमान रक्कम जमा करा. तुम्ही 31 मार्चपर्यंत किमान 500 रुपये जमा न केल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो. याशिवाय सुकन्या खात्यात किमान रक्कम 250 रूपये जमा करावी लागेल. या दोन्ही बचत योजनांमध्ये तुम्हाला प्रत्येक आर्थिक वर्षात किमान रक्कम (सरकारने निश्चित केलेली) जमा करावी लागेल. आर्थिक वर्ष 2022-23 साठी किमान रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख 31मार्च आहे.
4. SBI च्या अमृत कलश योजनेत गुंतवणूक
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची नवीन मुदत ठेव योजना अमृत कलश या महिन्यात संपणार आहे. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के तर इतरांना 7.1 टक्के व्याज दिले जात आहे. या मुदत ठेव योजनेत 400 दिवसांसाठी गुंतवणूक करावी लागेल.
5. अद्ययावत आयकर विवरणपत्र भरणे
आर्थिक वर्ष 2019-20 किंवा मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी अद्ययावत आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे. अद्ययावत रिटर्न संबंधित मूल्यांकन वर्षाच्या 24 महिन्यांच्या आत कोणीही दाखल करू शकतो. आयकर रिटर्नमध्ये काही विसंगती आढळल्यास अद्ययावत आयकर रिटर्न भरले जाते.
6. धन वर्षा योजना
एलआयसीच्या धन वर्षा योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे. त्यानंतर योजना बंद होणार आहे. धन वर्षा योजना ही एकल प्रीमियम पॉलिसी आहे. योजनेत विमाधारक व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. तर विमाधारक जिवंत राहिल्यास दुप्पट एकरकमी रक्कमही मिळते. ही योजना ऑफलाइन उपलब्ध आहे.
7. सिनियर सिटीझन केअर एफडी
एचडीएफसी बँकेने कोविडच्या काळात खास ज्येष्ठ नागरिकांसाठी मे 2020 मध्ये ‘सिनियर सिटीझन केअर एफडी’ ही विशेष एफडी योजना सुरू केली. योजनेचा कालावधी अनेक वेळा वाढवण्यात आला असून आता अंतिम तारीख 31 मार्च आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून 0.25 टक्के अतिरिक्त परतावा दिला जातो.