(नवी दिल्ली)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करताना रिझर्व्ह बँकेने (RBI) त्या बँकेत जमा करण्याची घोषणा केली आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेने नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंतची म्हणजेच 60 दिवसांची वेळ दिली आहे.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 19 मे 2023 पर्यंत 3.56 लाख कोटी रुपयांच्या मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा चलनात होत्या. 31 जुलै 2023 पर्यंत 3.14 लाख कोटी रुपये मूल्यांच्या 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये परत आल्याची माहिती बँकेने दिली आहे. आता फक्त 42,000 कोटी रुपयांच्या नोटा चलनात उरल्या आहेत. 2000 रुपयाच्या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ही शेवटची तारीख आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, 31 जुलै 2023 पासून 88 टक्के नोटा बँकेत परत आल्या आहेत. आता बाजारात फक्त 0.42 लाख कोटी रुपयांच्या नोटा म्हणजेच 12 टक्के 2 हजार रुपयांच्या नोटा बाजारात उरल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने जून महिन्यातही आकडेवारी सादर केली होती. त्यावेळी 2.72 लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा परत आल्या होत्या आणि आतापर्यंत 84,000 कोटी रुपये लोकांकडे उपलब्ध होते, मात्र एका महिन्यात हा आकडा निम्म्यावर आला आहे. परंतु अजूनही 42,000 कोटी रुपये मूल्याच्या 2,000 रुपयांच्या नोटा बाजारात आहेत. म्हणजेच आता 2000 चे एकूण 21 लाख बंडल बाजारात आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने आवाहन केले आहे की, नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी दोन महिने शिल्लक आहेत. शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी, लोकांनी 30 सप्टेंबर 2023 पूर्वी नोटा जमा कराव्यात, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.