(मुंबई)
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारकडून दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. या योजनेसाठी कोण महिला पात्र ठरणार आहेत, याची नियमावली सरकारने जाहीर केली आहे. यातले काही नियम सरकारने शिथिल केले आहेत. त्यामुळे या योजनेचा आणखी काही महिलांना लाभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा केली आहे. काही अटी व शर्तींमुळे या योजनेसाठी सरसकट सर्व महिला पात्र ठरत नव्हत्या. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेतील नियमात शिथिलता आणली आहे.
या घोषणेमधील त्रुटींचा पाऊस पाडत विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला वारंवार घेरले आहे. तसेच या योजनेतील काही अटी व शर्थींमुळे महिलांना या योजनेत पात्र ठरण्यास अडचणी येत होत्या. पण आता लाडकी बहीण योजनेवरुन मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेत दोन मोठे बदल करण्यात आल्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेतंर्गत महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच, यासाठी पात्र अपात्रतेचे निकष लावण्यात आले आहेत. त्यामधील दोन नियमांत शिथिलता आणण्यात आली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणा-या महिलांच्या वयामध्ये शिथिलता करÞण्यात आली आहे. वयोमर्यादा आता ५ वर्षांनी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता ६५ वर्षांपर्यंतच्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. याआधी २१ ते ६० वर्षापर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार होता. पण आता ही मर्यादा ६५ वर्षांपर्यंत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर केला आहे. त्याशिवाय ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता. परंतु, ही जमिनीची अटही आता शिथिल करण्यात आली आहे. जमिनीच्या मालकीची अट काढण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेत करण्यात आलेल्या बदलाची माहिती दिली. त्यानुसार आता 65 वर्षे वय असलेल्या महिलांनाही त्याचा फायदा होणार आहे. अर्ज करण्यासाठी गर्दी होत आहे. याची दखल सरकारने घेतली असल्याचेही ते म्हणाले. शिवाय वेळ निघून जाणार नाही याची काळजी सरकार घेईल. जर पैसे खात्यात जमा होण्यास वेळ लागला तर जुलै महिन्या पासूनचे सर्व पैसे एकदम खात्यात जमा केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. बहीण लाडकी योजनाही महायुतीच्या भावांकडून बहीणींना दिलेला आहेर आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
योजनेच्या लाभासाठी पोर्टल/ मोबाईल अॅपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल.
लाभार्थ्यांचं आधार कार्ड
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला
सक्षम प्राधिका-याने दिलेला कुटंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यंत असणं अनिवार्य (5) बँक खातं पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी)
पासपोर्ट आकाराचा फोटो
रेशनकार्ड
सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र