(नवी दिल्ली)
काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना 23 सप्टेंबर रोजी जारी होणार आहे, तर 17 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. या पदासाठी राहुल गांधी, अशोक गेहलोत आणि शशी थरूर यांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना तातडीनं दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वेणुगोपाल यांना दिल्लीत बोलावलं आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत असलेल्या भारत जोडो यात्रेत केसी वेणुगोपाल सहभागी आहेत. सध्या हा प्रवास केरळमधून होत आहे. मात्र, प्रवासादरम्यान केसी वेणुगोपाल यांना दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी वेणुगोपाल यांना राजधानीत बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. शशी थरूर उमेदवारीची घोषणा करू शकतात असे सांगितले जात आहे.
दरम्यान, अनेक राज्यांमध्ये राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष करण्याची मागणी होत आहे. काँग्रेसच्या सात राज्यांमध्ये राहुल गांधींना अध्यक्ष करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र, बिहार, जम्मू-काश्मीर आणि तामिळनाडू काँग्रेस युनिटनं हा ठराव मंजूर केला आहे. तत्पूर्वी, राजस्थान, गुजरात आणि छत्तीसगडच्या काँग्रेस युनिटनं रविवारी या संदर्भात ठराव मंजूर केला होता.