(मंडणगड)
महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय युवतीस एका युवकाने मंडणगड बाजारपेठेतून अज्ञात कारणाने फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी शुक्रवारी मंडणगड पोलिसात दाखल केली होती. त्यावरुन नांदेड जिल्हयातील लोहा तालुक्यातील शेवाडी येथील अल्ताब बशीर शेख याच्याविरोधात मंडणगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार, अपहरण झालेली युवती सकाळी ७.४५ वा. नेहमीप्रमाणे महाविद्यालयात गेली. ती नेहमी दुपारी १२.३० च्या सुमारास घरी परत येते. मात्र नेहमीच्या वेळी ती घरी परत न आल्याने फिर्यादी वडिलांनी तिला शोधण्यासाठी महाविद्यालयात जाऊन तिच्याविषयी चौकशी केली असता ती महाविद्यालयात नसल्याचे आढळले. अधिक शोध घेतला असता त्या युवकाने मुलीस सकाळी ७.४५वा. मंडणगड बाजारपेठेतून कोणत्यातरी अज्ञात कारणावरून तिला पळवून नेल्याचे फिर्यादी पित्यास समजले. त्यामुळे संशयित युवकाविरुध्द तक्रार करण्यात आली.
संशयिताविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांनी पालकांना आश्वस्त केले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उत्तम रहावी, यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनास शांततामय मार्गाने सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. घडलेला प्रकाराची माहिती शहर परिसरात समजताच शहरातील नागरिक व्यापारी वर्ग व नातेवाईक मंडणगड पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याबाबतची प्रक्रिया सुरू होती.