(पुणे)
स्वयंसेवी संस्था चालविणार्या महिलेसह दोघा जणींचे अपहरण करुन १७ लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार पुण्यातील उत्तमनगर भागात घडला आहे. उत्तमनगर पोलिसांकडून २ सराईत गुंडांसह चौघांना अटक केली आहे.
बाबुलाल मोहोळ, अमर मोहिते, प्रदिप नलवडे आणि अक्षय फड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई सोशल फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था चालवतात. पुणे रेल्वे स्थानकावर स्टॉल मिळवून देते, असे सांगून त्यांनी आरोपींकडून १० लाख रुपये घेतले होते. या पैशावरून त्यांच्यात वाद सुरु झाला.
आरोपींनी एके दिवशी महिला व त्यांच्या सहकारी मनिषा पवार यांना उत्तमनगर मध्ये बोलवून त्यांना मारहाण करत त्यांचे अपहरण केले. त्यांना नेऊन तेथे डांबून ठेवून मारहाण केली. त्या ठिकाणाहून फिर्यादी यांना फोन करुन १७ लाख रुपये आणून दे, नाही तर तुला व तुझ्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली. फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.