(रत्नागिरी)
पंधरामाड ते अलावा या किनारी भागासाठी तब्बल 169 कोटींचा नवा बंधारा मंजूर झाल्यानंतरही मिर्यावासीयांच्या नशिबी स्थलांतर कायम राहिले आहे. अलावानजिकच्या शेट्येवाडी येथे बंधार्याला गतवर्षी पडलेले भगदाड अद्यापही कायम असून पाऊस तोंडावर आला तरी त्याची डागडुजी संबंधित विभागाने केलेली नाही. उधाणाच्या लाटांचा तडाखा बसून घरांना धोका उद्भवू शकतो, अशी स्थिती निर्माण झाल्याने तहसीलदारांच्या सूचनेनंतर मिर्या तलाठ्यांनी 9 घर मालकांना सुरक्षित स्थळी जाण्याची नोटीस बजावली आहे.
या नोटीसांमुळे अलावा परिसरात पुन्हा संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या ठिकाणी वेळीच उपाययोजना न झाल्यास शेट्येवाडीला उधाणाच्या लाटांचा सामना करत जीव मुठीत धरुनच चार महिने वास्तव्य करावे लागणार आहे. पंधरामाड ते आलावा या साडेतीन किलोमीटरच्या किनारी भागात राज्य शासनाने सुमारे १६९ कोटींचा बंधारा मंजूर केला आहे. पत्तन विभागाच्या अधिपत्याखाली या बंधार्याचे काम होणार असून सुमारे पाच महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते या बंधार्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बंधार्याचे काम तत्काळ सुरु करा, असे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, गेले पाच महिने काम संथगतीने सुरु आहे. आतापर्यंत केवळ टेट्रापॉड तयार करण्याचे काम ठेकेदाराने सुरु केले आहे. तसेच अलावा शेट्येवाडी जवळ असलेले भगदाड कायम असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
बंधार्याचे सवेक्षण करून तत्काळ दुरूस्तीबाबत खबरदारी घ्या अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पत्तन विभागाने सर्व्हे करून पंधरामाड येथे 1, भाटीमिर्या 3 , जाकीमिर्या 2 आणि अलावा 2 ही सात ठिकाणे निश्चित केली आहेत. मात्र, अलावा येथील भगदाड ठेकेदाराने तसेच ठेवले आहे. पत्तन विभागाने बंधार्याला पडलेले भगदाड भरुन काढण्याची सूचना देवून तेथील काम पूर्ण करुन घेणे अपेक्षित असताना प्रशासनाने ग्रामस्थांनाच सुरक्षित स्थळी जाण्याच्या नोटीसा बजावल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
ज्या ग्रामस्थांना प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशासन दरवर्षी अशा नोटीसा देते. मात्र, बंधार्याचे काम जैसे थे आहे. दरवर्षी पावसाळ्यातच प्रशासनाला मिर्यावासियांची आठवण होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणत्याही परिस्थितीत घरे खाली करणार नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.