(मुंबई)
मूक- बधिर मुलांना ऐकण्याच्या वैगुण्यावर मात करून केवळ उच्च शिक्षण नाही तर त्यांना आत्मनिर्भर करण्याचा, त्यांच्यात आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न अमन शर्मा त्यांच्या टीच ह्या संस्थेद्वारे करत आहेत. त्यांचे कार्य स्पृहणीय आहे असे गौरवोद्गार, ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर ह्यांनी काल काढले.
टीच ह्या संस्थेचे संस्थापक अमान शर्मा ह्यांना १५ वा केशव सृष्टी पुरस्कार डॉक्टर निरगुडकरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. विले पार्ले येथील राजपुरीया हॉल येथे हा पुरस्कार सोहळा १३ ऑक्टोबर २०२४ रोजी संपन्न झाला. एक लाख रुपये, मान पत्र,मान चिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
ह्या पुरस्कार निवडीसाठी ११ महिलांची निवड समिती आहे, ज्यात केशवसृष्टीच्या माजी अध्यक्षा, प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. अलका मांडके, मुंबईच्या माजी महापौर डॉ शुभा राऊळ, माजी प्राचार्या डॉ. कविता रेगे, यशस्वी उद्योजिका हेमा भाटवडेकर, पेठे ज्वेलर्सच्या उद्योजिका राधा पेठे, पोलिस अधिकारी सुनयना नटे, वकील सुनिता तिवारी, पत्रकार वैजयंती आपटे, सामाजिक कार्यकर्त्या रश्मी भातखळकर, अर्चना वाडे आणि पुरस्कार निवड समिती अध्यक्षा श्रीमती अमेया जाधव यांचा समावेश आहे.
यावेळी बोलताना निरगुडकर म्हणाले की, समाजात काही माणसे माध्यमात गाजणारी असतात तर काही माणसे प्रत्यक्ष काम करणारी असतात. अमन शर्मा ह्यांना पुरस्कार देऊन केशवसृष्टी ने प्रत्यक्षात काम करणार्या व्यक्तीचा गौरव केला आहे.
टीच ही संस्था मूक-बधिर मुलांच्या उच्च शिक्षण, विविध कौशल्य शिक्षण ह्यासाठी काम करते आणि त्यांना उत्पन्नाचे साधन मिळवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करते. ह्या संस्थेची स्थापना २०१६ मध्ये झाली. सध्या ह्या संस्थेची मुंबई, पुणे आणि दिल्ली येथे केंद्र आहेत.
निरगुडकर पुढे म्हणाले की अमन शर्मा हे अश्या प्रत्येक मुलात आशेचा किरण जगावणारे व्यक्तिमत्व आहे. परिस्थितीच्या शापाला आनंदाचे वरदान त्यांनी दिले आहे. संस्थेतील मुलांनी आपल्या ऐकण्याच्या वैगुण्यावर नाही तर वैगुण्याच्या मानसिकतेवर मात केली आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी एका मन की बात मध्ये मूक –बधिर मुलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या सांकेतिक भाषेचे सुसूत्रीकरण करून एक केंद्र सरकारने एक डिक्शनरी ही काढली. अशी माहिती निरगुडकर ह्यांनी दिली.
यावेळी टीच संस्थेच्या मुलांनी एक नाटकही सादर केले. त्यावेळी अनेकांचे डोळे पाणावले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुरस्कार निवड समितीच्या प्रमुख अमेया जाधव ह्यांनी प्रास्ताविक केले आणि केशव सृष्टीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. केशवसृष्टीचे अध्यक्ष सतीश मोढ ह्यांनी आभार प्रदर्शन केले. राधा पेठे ह्यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.