(रत्नागिरी)
चालू वर्षी जिल्ह्यातुन जाणाऱ्या मुंबई – गोवा, मिऱ्या – नागपूर, गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्ग व चिपळूण-कराड, संगमेश्वर-कोल्हापूर, खेड पोलादपूर या राज्य मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना शिस्त लावण्यासाठी जिल्ह्यातील कशेडी, चिपळूण, हातखंबा या महामार्ग वाहतुक पोलीस मदत केंद्राचे पोलिसांकडून मदतकेंद्र व महामार्गावर इंटरसेप्टर वाहनाद्वारे विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली होती. त्यामध्ये एकूण 1 जानेवारी ते 30 जून 2022 मध्ये 15752 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 84 लाख 27 हजार 850 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती देताना रत्नागिरी विभाग महामार्ग वाहतुक पोलिस निरीक्षक रेश्मा कुंभार यांनी सांगितले की, चालू वर्षी १ जानेवारी ते 30 जून 2022 या दरम्यान महामार्ग वाहतूक पोलिस महासंचालक ठाणे यांच्या आदेशानुसार महामार्गावरील नियम तोडणा-या बेशिस्त वाहनचालकांवर व अवजड व अतिरिक्त भार वाहुन नेणा-या वाहनांवर दंडात्मक कारवाईची विशेष मोहिम राबविण्यात आली. गतवर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे दोन्ही राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर वाहतुकीमध्ये घट झालेली होती. त्यानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ वाढलेली असल्याने काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करतात त्याचा फटका इतर वाहनांना बसुन अपघात होतात व शिवाय महामार्ग चौपदरीकरण अर्धवट असल्याने खराब महामार्गाच्यामुळे अपघातात वाढ होत आहे. त्यासाठी शिस्त लागण्यासाठी कारवाई केली जाते.
चालू वर्षी इंटरसेप्टरद्वारे अति वेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. वाहन चालविताना मोबाईल वर चालकाने संभाषण करणे, वाहन चालविताना सीटबेल्ट न लावणे, अवजड वाहनांना पुढे व मागे रिफलेक्टर न लावणे, अवजड ट्रेलर व ट्रक यांसारख्या वाहनांतून फाळका न लावता उघडपणे मोठे पाईप व लोखंडी सळई सारखे साहित्य वाहतूक करणे व विना रिफ्लेक्टर्स वाहणे चालविणे, मालगाडीतून प्रवासी वाहतूक करणे, दुचाकीवर हेल्मेट न घालणे, तसेच विना विमा वाहन चालवले, माल गाडीतून प्रवाशी वाहतूक करणे, तसेच दारू पिऊन वाहन चालवणे, विमा नसताना वाहन चालविणे, विना परवाना वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा,दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणे, विना कागदपत्रे वाहतूक करणे व इतर प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चालकांवर एकूण 15752 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यातून 1 कोटी 84 लाख 27 हजार 850 रुपयांचा दंड करण्यात आला. जिल्ह्यातील याच राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावर प्राणांकित 137 अपघातांमध्ये 45 मयत झाले होते, तर गंभीर व किरकोळ 220 जखमी झाले होते.
जिल्ह्यातील महामार्गांवर वाहतुकीचे नियमन करण्याची व अपघात रोखण्याची मोहिम म.पो.म.केंद्र कशेडीचे पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदणे, म.पो.म. केंद्र चिपळूण पोलीस उपनिरीक्षक अजय यादव, म.पो.म. केंद्र हातखंबा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पाटील, विक्रमसिंघ पाटील यांच्या सह सर्व महामार्ग वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यानी राबवली.