लेट फी व पेनल्टी भरण्याची नोटीस न काढण्यासाठी 15 हजार रुपये लाच घेताना जीएसटी भवन येथील व्यवसाय कर अधिकाऱ्याला सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. स्वप्नाली सतीश सावंत (वय 39) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. सांगली एसीबीने ही कारवाई गुरुवारी उशिरा केली. याबाबत एका महिलेने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.
तक्रारदार महिला काम करत असलेल्या हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचे व्यवसाय कर व परफॉर्मन्स बोनस यावरील लेट फी व पेनल्टी भरण्याची नोटीस न काढण्यासाठी स्वप्नाली सावंत यांनी 25 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती 15 हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदार यांनी सांगली एसीबीकडे तक्रार केली.
सांगली एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता व्यवसाय कर अधिकारी स्वप्नाली सावंत यांना 15 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले.