(खेड/इकबाल जमादार)
सर्वसामान्यांसह गोरगरिबांचा आधार म्हणून ओळखले जाणारे राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा आज वाढदिवस. गोरगरिबांच्या सुखदुःखात नेहमीच समरस होणारे, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सतत धडपडत राहणारे, एवढेच नाही तर अन्याय होत असेल, तर त्या ठिकाणी नेहमीच सत्याच्या बाजूने झटणारे आमचे भाई म्हणजेच कोकणच सर्वस्व. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतानाच भाईंच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला थोडक्यात आढावा…
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित झालेल्या रामदासभाई कदम यांनी तारुण्याच्या उंबरठ्यावरच शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. एक सच्चा शिवसैनिक म्हणून सर्वसामान्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सेनेचा भगवा खाद्यांवर घेतला. ऐशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करीत सर्वसामान्य गोरगरीब, आबालवृद्धांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वांच्या हृदयात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले. त्यांनी कांदिवली पूर्व हनुमाननगर येथील शिवसेनेच्या शाखा प्रमुखपदाची सूत्रे हाती घेत राजकारणात पदार्पण केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या भाईंनी १९९० मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत विजयाची पताका फडकावली. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत विजयाची माळ भाईंच्या गळ्यात पडत होती. तेव्हापासून त्यांनी केव्हाच मागे वळून पाहिले नाही.
खेड तालुक्याचा भाईंनी केलेला सर्वांगीण विकास, विधानसभेत विविध विषयांवर – झाडलेल्या शब्दांच्या फैरी, झुंझार रणनीती, विविध क्षेत्रांतील कार्याचा आढावा आदी विषयांत भाईंचा हात कोणीच धरू शकत नाही. भाईंनी राजकीय क्षेत्रात केलेली कामगिरी व शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात घेतलेली झेप वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या या सर्वंकष कार्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मानाचे स्थान आहे.
खेडवासीयांसह राज्यातील जनतेच्या मनात भाईंनी जे अढळ पद मिळवलेले आहे त्याला मात्र तोड नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच दैवत मानणारे भाई सगळ्यांचा तितकाच आदर करतात. भाईंनी गरिबी म्हणजे काय, गरिबीचे चटके काय असतात, हे जवळून अनुभवले आहे. दुसऱ्याला मदत करण्याचा स्वभाव असल्याने जनमानसात स्वतःचे स्थान निर्माण करण्यास त्यांना वेळ लागला नाही. यामुळेच उत्तम लोकप्रतिनिधी कसा होऊ शकतो, हे भाईंनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.
केवळ कोकणातच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकाच्या घरात भाईंची प्रतिमा लखलखित आहे. आबालवृद्धांच्या ओठावर असलेल्या भाईंनी मराठवाड्यात दुष्काळ पडलेला असताना गरिबांचे अश्रू पुसण्यासाठी धावून जात त्या ठिकाणी सेनेच्या माध्यमातून केलेली अतुलनीय कामगिरी कौतुकास्पद म्हणावी लागेल. भाईंकडे आलेला प्रत्येक माणूस हा भाईंचा होऊन जातो. त्यांच्याकडे एखादे काम घेऊन गेलेली व्यक्ती कोणत्याही पक्षाची असली तरी त्यांचे अडलेले कोणतेही विकासकाम करणे हा भाईंचा अट्टहासच. प्रत्येकाचे काम वेगळे, प्रत्येकाचा प्रश्न वेगळा; पण कितीही गुंता असला तरी त्यातून भाई मार्ग काढतातच. मग चिंतित चेहऱ्याने आलेला माणूस एक वेगळंच समाधान घेऊनच निघतो. सतत कार्यमग्न राहणे हा भाईंचा ध्यास. जनतेच्या समस्या या स्वतःच्या समस्या समजून सोडवण्यासाठी प्रसंगी तहान-भूक विसरणारे भाई सर्वसामान्यांना आधार वाटतात. भाईंचा धाडसीपणा, निर्णय घेण्याची क्षमता, गोरगरिबांसाठी काहीतरी करण्याची तळमळ यामुळेच तळागाळातील जनतेच्या मनात त्यांनी अढळ स्थान मिळवले आहे, त्यांनी कोणतीही गोष्ट सचोटीने, निष्ठेने केली.
ग्रामदैवत कोटेश्वरी देवीच्या वास्तव्याने पावन झालेल्या जामगे गावच्या रामदासभाईंनी राजकीय पटलावर उत्तुंग झेप घेतली आहे. जिद्द, चिकाटी, संयम अशा गुणांच्या जोरावर महाराष्ट्राच्या राजकारणात उच्च स्तरावर पोहोचूनही आपल्या मातीला न विसरणारे माजी पर्यावरणमंत्री रामदासभाई कदम हे दुर्मिळ व्यक्तिमत्त्व. स्वकर्तृत्वावर एवढी उंची गाठूनही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न विसरणाऱ्या भाईंच्या हातून कोकणातीलच नव्हे, तर राज्यातील जनतेच्या, गोरगरीब रयतेच्या, दुष्काळग्रस्त शोषितांच्या समस्यांचे निराकरण व्हावे. राजकारणात येणाऱ्या नवीन युवकांना भाईंमुळेच नवसंजीवनी मिळत आहे. यापुढेदेखील आयुष्यभर त्यांनी यशाची उत्तुंग शिखरे जिंकावीत. एखाद्या सैनिकाप्रमाणे जीवनातील समाजकारण, राजकारण, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध चढाव पार पाडावेत. समाजकारणाच्या माध्यमातून जनतेचे हृदयसिंहासन काबिज करून जनसामान्यांमध्ये मानाचे स्थान मिळवणाऱ्या भाईंचा कार्यरूपी अश्वमेध असाच उधळत राहो. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत भाईंची भूमिका निर्णायक ठरावी. भाईंचा कार्यरूपी अश्वमेध असाच उधळत राहो, त्यांना दीर्घायुष्य लाभो, हीच वाढदिवशी सदिच्छा
सर्वसामान्य घरातून मोठे होत अनेक अडचणींचा सामना करत राजकीय कादकीर्द घडवलेले व आज राज्याच्या प्रमुख नेत्यांमध्ये नाव असलेले माजी पर्यावरणमंत्री रामदासभाई कदम ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे ब्रीद खऱ्या अर्थाने अंमलात आणताना दिसत आहेत. सर्व सामान्य जनतेविषयी प्रेम, आपुलकी असलेल्या या लाडक्या नेत्याचा आज वाढदिवस ! यानिमित्त त्यांच्या समाज कार्यावर टाकलेला दृष्टीक्षेप…!
रामदासभाईच्या राजकीय वाटचालीचे अनेकजण निकटचे साक्षीदार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे हे आईचे मूळ गाव. वडील पोलिस खात्यात होते. आई मुंबईतील कांदीवलीच्या पूर्व भागातील हनुमान नगरमध्ये एका चाळीत छोट्या खोलीत कदम कुटुंब राहत होते. “यशवंतराव चव्हाण विद्यालयातून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. नोकरी पतकरली परंतु त्याच काळात ते शिवसेनेत दाखल झाले.
निर्भीड स्वभाव, सामाजिक कार्याची आवड, लोकसंग्रहाची वृत्ती याचा बोलबाला झाला. शिवसेना शाखाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी रुग्णवाहिका सुरु केली. रुग्णवाहिकेच्या उद्घाटनासाठी स्वर्गीय शिवसेनाप्रमुख स्वत: आले होते. शिवसेना शाखेच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. या गणेशोत्सवाला मुंबईच्या अनेक संस्थेचे पुरस्कार मिळाले. सौ. मिनाताई ठाकरे दरवर्षी या गणेशोत्सवात सदिच्छा भेट देत होत्या.
शिवसेनेच्या माध्यमातून रामदासभाईंनी हनुमान नगरचा कायापालट केला. विविध प्रकारच्या नागरी सुविधा प्राप्त करु दिल्या. १९८९ साल उजाडले. १९९० साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित शिवसेनेने रामदासभाईंची खेड मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली. खेडचे केशवराव भोसले प्रतिस्पर्धी होते. भोसलेंच्या समोर कोणाचाच टिकाव लागणार नाही असे बोलले जात होते. पण भाई मात्र निश्चित होते. अखेर रामदासभाई प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले. १९९० साली भाई आमदार झाले आणि खेड मतदार संघाचे चित्रच पालटले. मतदार संघाशी सातत्याने संपर्क, कामाचा झपाटा यामुळे भाईंची लोकप्रियता वाढली. १९९५ ची निवडणूक ते सहजपणे जिंकले. १९९५ साली शिवसेना -भाजप युती सत्तेवर आली. प्रथम अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री झाले. या काळात त्यांनी पेट्रोल पंपावर अचानक भेटी देवून पेट्रोलमधील भेसळीचे गैरप्रकार उघडकीस आणले. गृहराज्यमंत्रीपदही त्यांनी सांभाळले. १९९७ साली व २००२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले.
विरोधी पक्षाचे आमदार म्हणून त्यांनी मतदार संघातील प्रश्न मांडले. मुद्देसूद भाषणामुळे सभागृहात त्यांचा प्रभाव पडू लागला. नारायण राणे शिवसेनेतून त्यावेळी बाहेर पडले. त्यावेळी शिवसेना गटनेतेपदी त्यांची निवड झाली. विरोधी पक्षनेते म्हणून राणे यांनी कारकीर्द गाजवली
होती. विरोधी पक्षनेतेपद भाजपाकडे असावे असे भाजपाचे प्रयत्नही झाले. रामदासभाईंनाच विरोधी पक्षनेतेपद द्यायचा निर्णय स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला.
रामदासभाई विरोधी पक्षनेते झाले. पण या पदावर जेमतेम महिना दोन महिने टिकतील असे भाकीत सत्ताधाऱ्यांनी केले होते. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या संधीचे त्यांनी सोने केले. भिवंडी दंगल, खैरलांजी हत्याकांड, मुंबईच्या समस्या आदी विषयावरील त्यांची भाषणे खूपच प्रभावी झाली. भाईंचे कर्तृत्व केवळ विधीमंडळातच मर्यादित नाही तर रत्नागिरी जिल्हा परिषद, खेड तालुक पंचायत समिती व खेड तालुका नगरपालिकेमध्ये त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवली आहे. खेड नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची सत्ता गेली तेव्हा भाई खूप निराश झाले. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामाही सादर केला होता. अर्थात तो स्वीकारला गेला नाही. भाई पुन्हा उत्साहाने कामास लागले आणि खेड नगरपालिकेवर पुन्हा भगवा फडकविला. शिवसेना प्रमुख स्वः बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहून अनेकवेळा विरोधकांनी वावड्या उठवूनही शिवसेनेला सर्वत्र विजय मिळवून दिला.
ज्या ज्या राजकीय विरोधकांनी भाईंना डिवचले त्यांना भाईंनी यशस्वी होवून दाखविले. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न साकार करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत रात्रंदिवस काम करुन मोलाचा वाटा उचलणाऱ्या शिवसेना नेते रामदासभाई कदम यांना मानाचे कॅबिनेट पर्यावरण मंत्री पद देवून कोकणला न्याय दिला. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी रामदासभाईना गृहमंत्री, अन्नपुरवठा मंत्री, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते, कॅबिनेट पर्यावरणमंत्री अशी महत्वाची मंत्रीपदे देवून सन्मान केला आहे. रामदासभाई हे आपल्या अनुभवावरुन आजही दिवसरात्र ते जनतेच्या विकासासाठी अहोरात्र झटत आहेत.
जामगे गावात रामदासभाईनी वृध्दाश्रम सुरु केले. सैनिक शाळा सुरु केली. या शाळेचा निकाल १०० टक्के लागतो. खेड मतदार संघातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी बचतगट स्थापन करुन अगरबत्ती बनविणे, साबण बनविणे इ. व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. खेड तालुक्यात वारकरी पंथाची मंडळी आहेत. त्यातील प्रत्येक मंडळात त्यांनी भजन साहित्य दिले. भाईंनी खेडमध्ये योगिता विद्यालय सुरु केले.
भाईंचा स्वभाव आक्रमक आहे. परंतु जिथे आक्रमकता आवश्यक तिथे कामचुकार अधिकाऱ्यांना भाई धारेवर धरतात. जनतेच्या समस्या जिथे सुटल्या जात नाहीत तिथे भाई आक्रमक होतात. गोरगरीबांना न्याय मिळाला नाही तर भाई आक्रमक होतात. पण जो चांगले काम आहे जिथे काही चांगलं घडत आहे तिथे भाई मऊ असतात. विरोधकांसमोर आक्रमकतेने ते आपली न्याय बाजू मांडतात व त्यांना जेरीस आणतात.
भाईंना उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याहस्ते मिळाला. कोकणातील व शिवसैनिकांसाठी हा आनंदाचा क्षण होता. विरोधी पक्षनेते असताना भाईंनी महाराष्ट्राच्या न्याय हक्कांसाठी सत्ताधारी पक्षाला जेरीस आणले. जनसामान्यांच्या मागण्या मान्य करुन घेतल्या व सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवला.
भाई उत्तम वक्ते
भाईंची वर्तृत्वशैली अमोघ आहे. त्यामध्ये जेवढी आक्रमकता तेवढीच लोकहिताची तळमळ आहे. त्यामुळेच भाईंच्या सभांना प्रचंड गर्दी असते. लोक भाईंचे भाषण ऐकायला आतूर असतात. अनेक सभा भाईंच्या भाषणामुळे गाजल्या. भाईंच्या सभा व सभेला होणारी गर्दी पाहूनच विरोधकांच्या मनात धडकी भरते. उत्कृष्ट संघटक भाईंचे संघटक कौशल्य उत्कृष्ट आहे. भाई संघटना वाढीसाठी दिवसरात्र मेहनत घेतात. आपल्या संघातील घराघरात भाई पोहोचले आहेत. मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीला भाई नावानिशी ओळखतात. भाईंनी अनेकांना पदे दिली. भाईंच्या विकास कार्यावर व नेतृत्वावर विश्वास ठेवून इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते आजही भाईंकडे येत आहेत. सर्वजनांसी आधारु भाईंचा सर्वांनाच आधार वाटतो.
भाईंची विशेषता म्हणजे आजही ते सामान्यातील सामान्य माणसाला भेटून त्याची समस्या जाणून घेवून त्यांना आधार देतात. भाई जामगे येथे आले की त्यांना भेटण्यासाठी लोकांची रीघ लागते. भाई रात्री अपरात्रीसुध्दा सर्वसामान्यांसाठी वेळ देतात. त्यांना प्रेमाचा आधार देतात. सर्वसामान्य लोक सहजच भाईंना भेटू शकतात. त्यासाठी अपॉईंटमेंटची गरज लागत नाही. दिवसभर भाई लोकांच्या गराड्यात असतात. कदाचित या लोकांमुळेच त्यांना काम करण्यासाठी उर्जा मिळत असावी. सर्वसामान्य लोकांचे भाईवर अतोनात प्रेम आहे व भाईंनाही याची पूर्ण जाणीव आहे.
शेतकऱ्यांचे सच्चे मित्र
भाई स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांनी दुःखे त्यांना माहीत आहे. शेतकऱ्यांसाठी अनेकवेळा संसदेत प्रश्न उपस्थित केले आहेत. शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून भाईंची मदत केली. पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या प्रेरणेतून भाईंनी दुष्काळी भागाचे दौरे केले. मराठवाडा, विदर्भ येथे कृषीक्षेत्रासाठी मागेल त्याला शेततळे, विहीरी पाडून देण्याचे शिवसेनेने हाती घेतले. पक्षाचा हा कार्यक्रम भाईंनी उत्तम नियोजनाव्दारे पार पाडला. शिवसेनेच्या माध्यमातून दुष्काळी भागातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तेथीलं शेतकऱ्यांच्या मुलीची लग्ने लावून दिली व संसार उपयोगी वस्तूंची मदतही केली. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत केली. त्यांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले. अशाप्रकारे शिवसेना प्रमुखांच्या सामाजिक कार्याचा आदर्श जपण्याचा प्रयत्न केला.
शिवसेनाप्रमुख हैच आपले दैवत आहे, असे भाई नेहमी म्हणतात. भाईमधील विशेष गुण त्यांची तळमळ, एकनिष्ठा ही शिवसेनाप्रमुखांनी ओळखून त्यांच्यावर विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी सोपवली व भाईंनी ती समर्थपणे पार पाडली. संघटनेला ताकद मिळेल, संघटना वाढीस लागेल अशा पध्दतीने कुशलतेने संघटन कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्यात त्यांचे सुपूत्र आमदार योगेशदादा कदम त्यांना साथ देत आहेत. भाई खऱ्या अर्थाने सर्वांचे बंधू बनले. सर्वांना प्रेमाची साथ दिली. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर प्रेमाची धाप दिली. तर कोणी चुकली तर वडीलकीच्या नात्याने कानउघडणीही केली. पुन्हा त्याला प्रेमाने जवळही केले.
प्लास्टिकचा भस्मासूर गाडला
भाईंनी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला व तो ऐतिहासिक ठरला. तो सर्वत्र चर्चेचा विषय बनला. या निर्णयाने देश-विदेशात कौतुक झाले. पर्यावरणाचा न्हास कमी करावयाचा असेल तर प्लास्टिक बंदीला पर्याय नाही. यासाठी सर्वांनी सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे. सर्व जनतेने प्लास्टिक बंदीचे उत्तमरित्या पालन केले तर प्लास्टिक बंदी हा पर्यावरणाला एक वरदान सिध्द होईल. यादृष्टीने आता सरकारची पावले पडतच आहेत. काही अवधी जाईल परंतु प्लास्टिकचा भस्मासूर नष्ट होईल यात कोणतीही शंका नाही.
आज रामदासभाई कदम यांचा वाढदिवस आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या विकास कार्याचा आलेख सतत उंचावत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !