(नवी दिल्ली)
अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीवर भव्य राममंदिर उभारल्यानंतर वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीखाली मंदिराचे अवशेष मिळाले आहेत. यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या हिंदू संघटनांनी पुढच्या लढ्याची तयारी केली आहे. अयोध्येनंतर देशातील 16 मंदिरांची जागा मिळवून तिथे पुन्हा मंदिर उभारण्याचे महाअभियान 14 फेब्रुवारीपासून वसंत पंचमीच्या मुहुर्तावर सुरू होणार आहे.
‘अयोध्या तो ट्रेलर है, बडा पिक्चर बाकी है,’ अशी हिंदू संघटनांची घोषणा आहे. मोगल राजा औरंगजेबाने भारतभरातील मंदिरे तोडून तिथे मशिदी उभारल्या. त्याची नीती वाईट होती. आता मुळात जिथे मंदिर होते त्या जागा ताब्यात घेऊन तिथे पुन्हा मंदिर उभारण्यासाठी 14 फेबु्रवारीपासून न्यायालयात दावे केले जाणार आहेत. 16 ठिकाणी पुरातत्व खात्याने पाहणी करून अहवाल द्यावा, अशी हिंदू पक्षकारांची मागणी आहे.
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पुरातत्व खात्याने त्या ठिकाणी पूर्वी भव्य मंदिर असल्याचा अहवाल दिला आहे. मथुरेतील शाही इदगाह मशिदीच्या जागी कृष्ण मंदिर होते आणि हे कृष्णाचे जन्मस्थान असल्याने तिथे मंदिर उभारावे यासाठी न्यायालयात खटला सुरू आहे. यानंतर कुतुबमीनार आणि ताजमहालबाबत न्यायालयात दाद मागितली जाईल. त्याचबरोबर उत्तर प्रदेशच्या बदायू येथील जामा मशीद, वाराणसी येथील धरहरा मशीद याबाबतही न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याची तयारी आहे.
वाराणसीत बिंदु माधव मंदिरात विष्णुची पूजा होत असे. मात्र 1669 साली औरंगजेबाने हे मंदिर पाडून तिथे धरहरा मशीद उभारली. आज मशिदीचे सर्वेक्षण केले तर तळघरात विष्णु मूर्ती नक्की सापडतील असा हिंदू संघटनांचा दावा आहे. अशा 16 स्थळांची यादी तयार असून, 14 फेब्रुवारीपासून सनातन धर्माचा शंखनाद करीत या सर्व 16 ठिकाणी मंदिर उभारण्याचा हक्क मागण्यांसाठी न्यायालयात खटले दाखल करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील हरिशंकर जैन यासाठी मार्गदर्शन करीत आहेत.