(मुंबई)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संपूर्ण इमारतीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले पोलिस हजेरी लावून गायब झाल्याने खळबळ उडाली होती. यापैकी १२ पोलिसांना निलंबित करण्यात आले असून, त्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
२२ सप्टेंबर रोजी नेहमीपेक्षा कमी पोलिस मनुष्यबळ असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) व्यवस्थापनाच्या लक्षात आले. व्यवस्थापनाने पोलिस प्रशासनाकडे विचारणा केली असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली.
शहरातील महत्त्वाच्या आस्थापनांसह रिझर्व्ह बँकेच्या नव्या आणि जुन्या इमारतींना पोलिसांच्या सशस्त्र विभागाने सुरक्षा पुरविली आहे. रिझर्व्ह बँकेच्या सुरक्षेसाठी ८० पोलिस शिपायांची नेमणूक केली आहे. त्यांपैकी १४ शिपाई २२ सप्टेंबरला कर्तव्यावर गैरहजर असल्याचे प्राथमिक चौकशीतून निदर्शनास आले.
सशस्त्र विभागाच्या कारकुनाकडे याबाबत चौकशी करताच तोही रजेवर होता. गैरहजर असलेल्या १४ पैकी ११ जणांनी त्या दिवसाची हजेरी लावल्याचे चौकशीत आढळले. मात्र, ते रिझर्व्ह बँकेत कर्तव्यावर नव्हते तर मुंबईबाहेर होते, असे निष्पन्न झाले.
कारकुनाची करामत
कारकुनाने त्यांची हजेरी लावल्याचे स्पष्ट होताच ११ शिपायांसह कारकुनालाही निलंबित करण्यात आले. त्यांनी यापूर्वीही असा गैरप्रकार केला होता का? याबाबतही चौकशी सुरू करण्यात आली आहे.